कर्ज बाजारीपणास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
By संदीप शिंदे | Published: May 15, 2023 06:10 PM2023-05-15T18:10:18+5:302023-05-15T18:11:02+5:30
पिकाला पाणी देण्यासाठी जात असल्याची सांगत शेतात जाऊन केली आत्महत्या
शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील दैठणा येथील एका शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्जाला कंटाळून शनिवारी रात्री पांढरवाडी शिवारातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैठणा येथील अल्पभूधारक शेतकरी नितीन शिवाजी बिरादार (वय ३८) यांची दैठणा शिवारात जमीन असून, त्यांनी विविध सोसायटीमाद्वारे जिल्हा बँकेकडून ७५ हजारांचे कर्ज तसेच बचत गटाकडून ५० हजार कर्ज घेतले होते. सततची नापिकी व कर्ज फेडायचे कसे, मुलांचे शिक्षण कसे करणार या विवंचनेत ते होते. त्यांनी शनिवारी रात्री ऊसाला पाणी देण्यासाठी शेताकडे जात आहे असे सांगुन पांढरवाडी शिवारातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत शिवाजी बिरादार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.