शहीद जवान मच्छिंद्रनाथ चापोलकर यांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप

By संदीप शिंदे | Published: August 21, 2022 05:59 PM2022-08-21T17:59:27+5:302022-08-21T18:00:04+5:30

जानवळ येथे चापोलकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

A final farewell to martyr Machhindranath Chapolkar in a mournful atmosphere | शहीद जवान मच्छिंद्रनाथ चापोलकर यांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप

शहीद जवान मच्छिंद्रनाथ चापोलकर यांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप

googlenewsNext

संदीप शिंदे

जानवळ (जि. लातूर) : चाकूर तालुक्यातील जानवळ येथील शहीद जवान मच्छिंद्रनाथ चापोलकर यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नागरिकांनी शहीद जवान अमर रहे, भारत माता की जय... अशा घोषणा देत साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. पोलीस दलातर्फे हवेत बंदुकीच्या फैरी झाडून शहीद जवानास मानवंदना देण्यात आली. 

जानवळ येथील शहीद जवान मच्छिंद्रनाथ चापोलकर यांचे शुक्रवारी दिल्ली येथील आर्मी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले होते. त्यांचे पार्थिव दिल्ली येथून विमानाने हैद्राबाद येथे व तेथून जानवळ या त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले. दरम्यान, नांदगाव पाटी येथून पार्थिव असलेल्या रुग्णवाहिकेसोबत तरुणांनी तिरंगा रॅली काढली. गावातील हनुमान मंदिराच्या चौकामध्ये त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अंतिम दर्शनासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

यावेळी खासदार सुधाकर शृंगारे, आमदार बाबासाहेब पाटील, माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, पोलीस उपाधीक्षक निकेतन कदम, उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, शिवसेना तालुकाध्यक्ष गुणवंत पाटील, उपनगराध्यक्ष अरविंद बिराजदार आदींनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, शोकाकुल वातावरणात जानवळ विविध कार्यकारी सोसायटीच्या मैदानावर शहीद जवान मच्छिंद्रनाथ चापोलकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचा १२ वर्षीय मुलगा नीरज याने मुखाग्नी दिला. पोलीस दलातर्फे हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. यावेळी जानवळसह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शहीद जवान मच्छिंद्रनाथ चापोलकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा नीरज, मुलगी हर्षदा, दोन विवाहित बहिणी आहेत.

Web Title: A final farewell to martyr Machhindranath Chapolkar in a mournful atmosphere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.