लातूरात कट्ट्यावर जोपासला जातो वाचन छंद; मनपाच्या अनोख्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
By हणमंत गायकवाड | Published: October 11, 2023 07:16 PM2023-10-11T19:16:17+5:302023-10-11T19:17:37+5:30
वाचाल तर वाचाल, लातूर शहरात आठ ठिकाणी वाचन कट्ट्याची सोय
लातूर : वाचनाचा छंद असलेल्या व्यक्ती दैनंदिन आयुष्यात अडचणींवर मात करण्यासाठी मार्ग काढण्यात माहीर असतात. त्यामुळे भरपूर वाचन करायला हवे. वाचाल तर वाचाल... असा संदेशच जणू महानगरपालिकेने लातूरकरांना दिला आहे. शहरातील चार झोनमध्ये प्रत्येकी दोन याप्रमाणे आठ वाचन कट्टे तयार करण्यात आले आहेत.
दररोज २०० या प्रमाणे सहा हजार जणांनी या कट्ट्यावर जाऊन वाचन छंद जोपासला आहे. समाजात मोबाइल, इंटरनेटचे प्रस्थ वाढले आहे. त्यामुळे अनेकांनी वाचनाच्या सवयीला सोडचिठ्ठी दिली आहे. सध्या खूप कमी लोक पुस्तकं वाचतात. इंटरनेट आणि मोबाइलमुळे वाचनाची सवय कमी झाली आहे.
वाचनामुळे व्यक्तिमत्त्व विकासात पडते भर...
वाचनामुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावून व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. त्यामुळे महानगरपालिकेने वाचन कट्टे तयार केले आहेत. ए, बी, सी आणि डी अशा चार झोनमध्ये प्रत्येकी दोन वाचन कट्टे आहेत. त्या कट्ट्यावर वेगवेगळे मॅगझिन आणि वर्तमानपत्रे असतात.
या उपक्रमाला ज्येष्ठांसह तरुणांचाही प्रतिसाद मिळत आहे. गेल्या महिनाभरात सहा हजार लोकांनी वाचन कट्ट्यावर वर्तमानपत्रांसह मॅगझिन वाचले आहेत.
वाचन कट्ट्यावर प्रारंभी ज्येष्ठांचीच रेलचेल होती. पण आता तरुणांचीही भर त्यात पडत आहे. वाचनाचे फायदे ज्येष्ठांकडून तरुणांना सांगितले जात असल्यामुळे वाचकांची संख्या वाढत आहे.
या ठिकाणी आहेत वाचन कट्टे...
ए झोनमध्ये सोहेलनगर, मुंदडा डेअरी परिसर
बी झोनमध्ये नाना-नानी पार्क, एसटी वर्कशॉप
सी झोनमध्ये बाभळगाव चौक परिसरातील शिक्षक कॉलनी, दसरा मैदान ग्रीन बेल्ट
डी झोनमध्ये टागोरनगर, बसवेश्वर चौक परिसर
वाचन कट्ट्यावर वर्तमानपत्रे...
वाचनाची गोडी लावण्यासाठी महापालिकेने वाचन कट्टे तयार केले आहेत. शहरातील चारही झोनमध्ये प्रत्येकी दोन असे आठ कट्टे असून, त्या ठिकाणी वेगवेगळे दहा वर्तमानपत्रे आणि काही पुस्तकांचा समावेश असतो.