Video: लातूरात चार मजली इमारतीला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू
By संदीप शिंदे | Published: October 26, 2023 10:41 AM2023-10-26T10:41:33+5:302023-10-26T10:42:42+5:30
आज सकाळी ८.३० वाजेची घटना
लातूर : शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात उड्डाणपुलालगत असलेल्या एका इमारतीला गुरुवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. यात तिघांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. या आगीमध्ये मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.
लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील चार मजली इमारतीला गुरुवारी सकाळी अचानक आग लागली. काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केल्याने ऑटोमोबाईल आणि फोटो स्टुडिओचे मोठे नुकसान झाले. ही आग पहिला मजला, दुसरा मजला करीत चौथ्या मजल्यापर्यंत पोहचली. आगीमुळे धुराचे मोठया प्रमाणात लोट दिसून आले. स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याला दिली. पोलीस निरीक्षक दिलीप सागर यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत अग्निशमन दलास पाचारण केले. मात्र, तोपर्यंत आगीत होरपळून तिघांचा मृत्यू झाला. सुनील लोंढे, प्रमिला लोंढे, कुसूंबाबाई लोंढे अशी मृतांची नावे आहेत.
लातूरात चार मजली इमारतीला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू #latur#firebrigadepic.twitter.com/KMJQVoyfhz
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) October 26, 2023
आग मोठी आल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना ती आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे पोलिसांनी तो मार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद केला होता. आग आटोक्यात आणल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली. या आगीच्या घटनेत नेमके किती नुकसान झाले आहे हे समजू शकले नाही. घटनास्थळी पोलिसांकडून पंचनामा सुरू असून, दुपारपर्यंत आगीचे कारण आणि झालेल्या नुकसानीचा आकडा समोर येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक दिलीप सागर यांनी सांगितले.