पाण्यासाठी महिनाभरापूर्वी प्रस्ताव; विहीर अधिग्रहणास मंजुरी मिळेना, हिवाळ्यात पाणीटंचाईचे चटके
By हरी मोकाशे | Published: January 12, 2024 07:12 PM2024-01-12T19:12:30+5:302024-01-12T19:13:02+5:30
जिल्ह्यातील ३२ गावे- वाड्या तहानल्या
लातूर : गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीएवढाही पाऊस न झाल्याने जिल्ह्यास पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी टंचाईग्रस्त गाव- वाड्यांनी जवळपास तीन आठवड्यांपूर्वी प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र, अद्यापही त्यास मंजुरी देण्यात आली नाही. परिणामी, पाण्यासाठी भटकंती होत आहे. सध्या जिल्ह्यातील ३२ गावे- वाड्या तहानल्या आहेत.
गत पावसाळ्यात विलंबाने व अल्प प्रमाणात पर्जन्यमान झाले. ऑगस्टमध्ये तर पावसाने महिनाभरापेक्षा अधिक दिवस ताण दिला होता. परिणामी, खरीपातील सोयाबीन उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. दमदार पावसाअभावी जिल्ह्यातील मांजरा, तेरणा, तिरु या प्रमुख नद्या वाहिल्या नाहीत. शिवाय, ओढे- नाले खळखळले नाहीत. त्यामुळे मध्यम प्रकल्पासह विहिरी, कुपनलिकांच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही.
दरवर्षी जिल्ह्यात परतीचा पाऊस होतो. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांची त्यावर आशा होती. परंतु, परतीच्या पावसानेही पाठ फिरविली. परिणामी, आशा हवेतच विरल्या. त्यामुळे डिसेंबरपासूनच जिल्ह्यातील काही गावांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. दिवसेंदिवस पाणीटंचाईची तीव्रता वाढत असल्याचे दिसून येत आहे.
२५ गावे अन् ७ वाड्यांचे अधिग्रहणासाठी प्रस्ताव ...
जिल्ह्यातील २५ गावे आणि ७ वाड्यांनी अधिग्रहणाचे एकूण ४० प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केले आहेत. दरम्यान, पंचायत समितीने पाहणी करुन त्यातील ५ गावांचे सहा प्रस्ताव वगळले आहेत. उर्वरितपैकी ६ गावे आणि ५ वाड्यांचे एकूण ११ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे सादर केले आहेत. विशेषत: हे प्रस्ताव सादर करुन जवळपास तीन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. मात्र, अद्यापही त्यास मंजुरी मिळाली नसल्याचे पहावयास मिळत आहे.
टंचाई निवारण आराखडा कशासाठी?...
पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणासाठी कृती आराखडा तयार केला. त्यात अधिग्रहणासाठी तरतूद करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही मंजुरी देण्यात आली नसल्याने हा आराखडा कशासाठी असा सवाल टंचाईग्रस्त गावातील नागरिकांतून करण्यात येत आहे.
मध्यम प्रकल्पातील पाणीपातळी घटली...
यंदा कमी पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्यातील आठही मध्यम प्रकल्पात अपेक्षित जलसाठा झाला नाही. सध्या लातूर तालुक्यातील तावरजा, व्हटी आणि उदगीर तालुक्यातील तिरु मध्यम प्रकल्प जोत्याखाली गेले आहेत. तिथे उपयुक्त जलसाठा शून्य आहे. रेणापूर प्रकल्पात ३.२१३, देवर्जन- २.६८९, साकोळ - ४.२४०, घरणी - ५.५४७, मसलगा - ६.०३५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. एकूण पाच मध्यम प्रकल्पात २१.७१४ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे.
मसलगा प्रकल्पात ४४ टक्के पाणीसाठा...
प्रकल्प - उपयुक्त साठा (टक्के)
तावरजा - ००
व्हटी - ००
रेणापूर - १५.६३
तिरु - ००
देवर्जन - २५.१८
साकोळ - ३८.७२
घरणी - २४.६९
मसलगा - ४४.३८
एकूण - १७.७८
लवकरच मंजुरी मिळेल...
जवळपास तीन आठवड्यांपासून अधिग्रहणासाठी प्रस्ताव दाखल होत आहेत. पंचायत समितीकडून तहसीलकडे प्रस्ताव दाखल होत आहेत. अधिग्रहण करण्याचे अधिकार तहसीलदारांना दोन दिवसांपूर्वी देण्यात आले आहेत. त्यामुळे लवकर अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु होईल, असे जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे व पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.