पावसाळ्याचा एक महिना उलटला; मध्यम प्रकल्पांत जेमतेम जलसाठा!

By हरी मोकाशे | Published: July 10, 2024 06:45 PM2024-07-10T18:45:58+5:302024-07-10T18:49:05+5:30

यंदा जिल्ह्यात मृगाच्या प्रारंभी दमदार पाऊस झाल्याने उन्हाच्या दाहकतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.

A month of rainy season passed; Hardly water storage in medium projects in latur! | पावसाळ्याचा एक महिना उलटला; मध्यम प्रकल्पांत जेमतेम जलसाठा!

पावसाळ्याचा एक महिना उलटला; मध्यम प्रकल्पांत जेमतेम जलसाठा!

लातूर : पावसाळा सुरु होऊन एक महिना उलटला आहे. दमदार पावसामुळे खरीप पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या असल्या तरी अद्यापही मध्यम प्रकल्पांत जेमतेम पाणीसाठा झाला आहे. आठपैकी पाच मध्यम प्रकल्पांमध्ये १०.७९ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागून असून पुनर्वसूवर आशा वाढली आहे.

यंदा जिल्ह्यात मृगाच्या प्रारंभी दमदार पाऊस झाल्याने उन्हाच्या दाहकतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे खरीप पेरण्यांना वेगही आला. त्याचबरोबर प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक येण्यास सुरुवात झाली. तद्नंतरच्या आर्द्रा नक्षत्रातील पहिल्या आठवड्यात पावसाने उघडीप दिली. त्यामुळे शेतकऱ्यांची धास्ती वाढण्यास सुरुवात झाली होती. दरम्यान, रिमझिम पाऊस झाल्याने कोवळ्या पिकांना जीवदान मिळाले. पाच दिवसांपासून पुनर्वसू नक्षत्रास प्रारंभ झाला आहे. सुरुवातीपासून कमी- जास्त प्रमाणात पाऊस होत असल्याने आशा वाढल्या आहेत.

मसलगा प्रकल्पात सर्वाधिक पाणीसाठा...
प्रकल्प - उपयुक्त पाणी (टक्के)

तावरजा - ००
रेणापूर - २३.१५
व्हटी - ००
तिरु - ००
देवर्जन - २.८९
साकोळ - ३.११
घरणी - ३.४६
मसलगा - ५१.४७
एकूण - १०.७९

जळकोट तालुक्यात सर्वात कमी पाऊस...
तालुका - आतापर्यंतचा पाऊस (मिमी)

लातूर - ३३७.२
औसा - ३३५.४
अहमदपूर - २७४.०
निलंगा - २९८.३
उदगीर - १९६.४
चाकूर - २९३.१
रेणापूर - ३५४.०
देवणी - २०२.५
शिरुर अनं. - २२३.८
जळकोट - १६६.५
एकूण - २८४.१

प्रकल्पांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा...
जिल्ह्यातील आठपैकी पाच मध्यम प्रकल्पांमध्ये १३.१८४ दलघमी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. तावरजा, व्हटी, तिरु प्रकल्पांत अद्यापही उपयुक्त जलसाठा झाला नाही. रेणापूर प्रकल्पात ४.७५९, देवर्जन- ०.३०९, साकोळ- ०.३४०, घरणी- ०.७७६, मसलगा- ६.९९९ दलघमी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. एकूण १३.१८४ दलघमी जलसाठा झाला आहे.

लघु प्रकल्पांमध्ये ८.९७ टक्के जलसाठा...
जिल्ह्यात एकूण १३४ लघु प्रकल्प आहेत. त्यात उपयुक्त पाणीसाठी २६.६१२ दलघमी आहे. तो साठा ८.९७ टक्के आहे. दरम्यान, प्रकल्पांतील जलसाठ्यात वाढ होण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागून आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २८४.१ मिमी पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी १४०.७ मिमी पाऊस झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट पाऊस झाला आहे.

असमान पावसामुळे पाणीटंचाई सुरुच...
पावसाळा सुरु होऊन एक महिना उलटला आहे. दमदार पाऊस झाला असला तरी तो असमान आहे. त्यामुळे काही तालुक्यातील गावांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सर्वाधिक पाऊस रेणापूर तालुक्यात झाला आहे तर सर्वात कमी पाऊस जळकोट तालुक्यात झाला असून १६६.५ मिमी अशी नोंद आहे.

Web Title: A month of rainy season passed; Hardly water storage in medium projects in latur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.