पोलिसांची जीप उसाच्या ट्रॉलीवर धडकली ; पोलिस हवालदार ठार
By राजकुमार जोंधळे | Published: February 28, 2024 09:47 PM2024-02-28T21:47:55+5:302024-02-28T21:47:55+5:30
दोन कर्मचारी गंभीर : बुधोडा येथील घटना
लातूर : औसा येथून गस्तीवर निघालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची जीप उसाच्या ट्रॉलीवर धडकली. हा अपघात नागपूर-रत्नागिरी महामार्गावरील बुधोडा (ता.औसा) येथे मंगळवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडला. यात चालक युवराज किशनराव पांचाळ (वय ५२), पोलिस कर्मचारी मोतीराम घुले (वय ४२) आणि होमगार्ड धीरज मुंजाळ (वय ५०, तिघे रा. औसा) हे गंभीर जखमी झाले. यातील चालक पांचाळ यांचा उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. याबाबत औसा पोलिस ठाण्यात बुधवारी नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले, औसा पोलिस ठाण्यात कर्तव्यावर आसलेले पोलिस हेड कॉन्स्टेबल चालक युवराज पांचाळ, सोबत मोतीराम घुले आणि होमगार्ड धीरज मुंजाळ हे औसा टी-पाईन्ट ते बुधोडा गावादरम्यान मंगळवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास जीपमधून (एम.एच. २४ ए. डब्ल्यू. ९३३७) गस्त घालत होते. समोर असलेल्या उसाच्या ट्रॉलीवर पोलिसांची जीप आदळली. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने लातुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील चालक पांचाळ यांचा उपचारादरम्यान मंगळवारी पहाटेच मृत्यू झाला. तर दोघा जखमींवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती औसा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील रेजितवाड यांनी दिली.
याबाबात औसा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद बुधवारी करण्यात आली आहे. हा अपघात कसा झाला, नेमकी चूक कोण्या चालकाची आहे, याचा तपास पोलिस करत आहेत.