लातुरात भरधाव जीपने शाळकरी मुलाला चिरडले; दुधवाल्यासह मुलगा गंभीर जखमी
By राजकुमार जोंधळे | Published: August 21, 2022 11:51 AM2022-08-21T11:51:08+5:302022-08-21T11:55:02+5:30
दुधवाल्यासह मुलगा गंभीर जखमी
लातूर : गांधी चौकाकडून विवेकानंद चौकाकडे भरधाव निघालेल्या जीपचालकाने दोघा शाळकरी मुलांसह एका दुधवाल्याला चिरडल्याची घटना सम्राट चौकात रविवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. यात १५ वर्षीय शाळकरी मुलगा ठार झाला असून, दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. बेदरकारपणे वाहन चलविणाऱ्या चालकाने अनेकांना धडक देऊन पसार झाल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी सांगितले, लातुरातील गौसपुरा भागात राहणारा अरसलान गफार शेख (वय १५) हा ज्ञानेश्वर विद्यालयात इयत्ता ९ वी मध्ये शिकत होता. दरम्यान, तो रविवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या मित्रासोबत खासगी शिकवणीला निघाला होता. गांधी चौकाकडून भरधाव आलेल्या जीप चालकाने सम्राट चौकात आल्यानंतर एका दुधवाल्यासह दोघा शाळकरी मूलांना चिरडले.
हा अपघात एवढा भीषण होता की, अरसलान शेख व त्याचा मित्र रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. घटनास्थळी तातडीने दाखल झालेल्या नागरिकांनी त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी अरसलान शेख याला मृत घोषित केले. तर सोबतचा शाळकरी मुलगा गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिवाय, दूधवाल्याचा पाय फॅक्चर झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
जीपचाल झाला पसार...
अतिशय बेदरकार आणि भरधाव असलेल्या जीप चालकाने किती जणांना चिरडले?, याची माहिती आमचे पोलीस घेत आहेत. गांधी चौक ते नवीन नांदेड नाका मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे, फुटेजची पाहणी केली जात आहे, असे गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांनी सांगितले.
वेगवान जीपचा नंबर पहिला नाही...
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, शाळकरी मुलांना चरडणारी जीप एवढी भरधाव होती की, काही क्षणात तो जीप चालक पसार झाला. जीपचा क्रमांकही पाहण्यासाठी संधी मिळाली नाही. दरम्यान, नांदेड मार्गावरुन सुसाट गेलेल्या जीपचा पोलीस शोध घेत आहेत. तो हाती लागला तरच अधिक माहिती हाती लागणार आहे, असेही पोलिसांनी सांगितले.