भरधाव कारची दुचाकीला धडक, एक ठार तर दोघे जखमी
By आशपाक पठाण | Published: January 11, 2024 11:55 PM2024-01-11T23:55:57+5:302024-01-11T23:57:48+5:30
औसा तालुक्यातील चालबुरगा पाटीनजीकची घटना
औसा : वेळाअमावस्या निमित्त शेताकडे आलेल्या पानचिंचोली येथील तरुणाने गावाकडे जाण्यासाठी दुचाकीस्वाराला लिफ्ट मागितली. दुचाकी औशाकडे जात असताना पाठीमागून ओव्हरटेक करणाऱ्या भरधाव कारने मोटारसायकलला जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील दोघे लांबवर जाऊन पडले. यात पानचिंचोली येथील तरुण जागीच ठार झाला. तर अन्य दोघे जखमी झाले. यात एकाची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना गुरूवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी सांगितले, दुचाकी क्रमांक एम एच २४ बीयू १४१९ ही लामजन्याहुन औशाकडे येत होती.या दुचाकीवर दोघे जात असताना चलबुर्गा पाटीजवळील पेट्रोल पंपाच्या शेजारी पाठीमागून येणाऱ्या एम एच १४ एफ एस ६९९९ कारने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरील दुचाकीला जबर धडक दिली.या अपघातात मोटारसायकल ४० फुटावर फरफटत गेली.अन् कार पेट्रोल पंपाच्या खांबावर आदळली.
यात दुचाकीस्वार शिवकुमार अशोक कांबळे (वय २२) यांचा जागीच मृत्यू झाला.तर इतर दोघेही जखमी झाले. जखमींना उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले. मयताचे पार्थिव लामजना येथील आरोग्य केंद्रात ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालू होती.