कुस्तीगीरांच्या मिरवणुकीने उदगीरात क्रीडामय वातावरण; खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेला सुरुवात
By संदीप शिंदे | Published: March 9, 2024 05:10 PM2024-03-09T17:10:18+5:302024-03-09T17:11:00+5:30
उदगीर शहरात प्रथमच स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा होत असून, ३६० खेळाडू दाखल झाले आहेत.
उदगीर : फेटे परिधान केलेले रूबाबदार कुस्तीगीर, ढोल पथक, लेझिम पथकाच्या निनादात उदगीर शहरातून काढण्यात आलेल्या कुस्तीगीरांच्या मिरवणुकीने उदगीरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले होते. स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेनिमित्त मिरवणूकीने उदगीर शहर कुस्तीमय झालेला अनुभव राज्यातील कुस्तीपटूंना अनुभवला.
उदगीर येथील जिल्हा परिषद मैदानावर भव्य उद्घाटन होण्यापूर्वी कुस्तीपटूंची मिरवणूक काढण्यात आली. सर्व दाखल कुस्तीगीरांची शहरात गाडीतून व घोड्यावर बसवून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लातूर येथील सदानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या ढोल पथकाने व लेझीम पथकाने सहभाग नोंदविला. या मिरवणुकीत उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, तालुका क्रीडा अधिकारी लोदगेकर, प्रा.श्याम डावळे, शेख समीर, बाळासाहेब मरलापल्ले, सय्यद जानी, शशिकांत बनसोडे, कुणाल बागबंदे, इब्राहीम देवर्जनकर, प्रदीप जोंधळे, कपील शेटकार, वसंत पाटील यांच्यासह कुस्तीगीर व कुस्तीप्रेमी नागरिक उपस्थित होते. क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांनी दुरदृष्य प्रणालीव्दारे मिरवणुकीचा व कुस्ती स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेतला. उदगीर शहरात प्रथमच स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा होत असून, ३६० खेळाडू दाखल झाले आहेत. शनिवारी पंच उजळणी शिबिरानंतर कुस्तीपटूंनी वजने घेण्यात आली.
विविध वजनी गटाच्या कुस्ती स्पर्धा रंगल्या...
फ्रिस्टाईल ५७ किलो, ७० किलो, ९७ किलो, ग्रिकोरोमन ५५ किलो, ७७ किलो, १३० किलो, महिला गटाच्या ५० किलो, ५९ किलो, ७७ किलो वजनी गटाच्या लढती आज रंगल्या होत्या. राज्यातील कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, अहमदनगर, जळगांव, रायगड, पिंपरी चिंचवड व यजमान लातूर संघ पदकांसाठी झुंज दिली. स्पर्धेसाठी ३ मॅटची कुस्ती मैदाने सज्ज झाले असून ८ हजार प्रेक्षक क्षमतेची गॅलरी उभी करण्यात आली आहे. स्पर्धेतील सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक विजेत्यांना अनुक्रमे ६० हजार, ५० हजार व ३०हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.