मराठा आरक्षणासाठी लोकप्रतिनिधींची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून महामार्गावर चक्काजाम
By संदीप शिंदे | Published: October 28, 2023 02:08 PM2023-10-28T14:08:33+5:302023-10-28T14:09:55+5:30
मराठा आरक्षणाची मागणी, चक्का जाममुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा
बोरगाव काळे ( लातूर) : मराठा आरक्षणासाठी मुरूड-लातूर मार्गावरील बोरगाव काळे येथे शनिवारी सकल मराठा समाजाच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प होती.
मराठा आरक्षण आंदोलनात जालना येथे झालेल्या लाठीचार्जचा निषेध, सरसकट मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण देण्यात यावे, मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा व मराठा आरक्षणावर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांच्या निषेधार्थ चक्का जाम करण्यात आला. सर्कलमधील निवळी, शिराळा, एकुरगा, माटेफळ, रामेगाव, खंडाळा, मुरूड, गाधवड येथील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. महामार्गावर चक्का जाम करत तरुणांनी घोषणाबाजी केली. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांचा जाहीर निषेध करण्यात आला. पाच मुलांच्या हस्ते तलाठी आशुतोष कांबळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निळकंठ काळे, उमेश देशमुख, उद्धव जाधव, दादा पवार, आप्पा काळे, गोविंद देशमुख, राहुल काळे,दीपक इंगळे, धर्मराज पाटील, ॲड. विजय जाधव, सूरज शिंदे आदींसह समाजबांधव उपस्थित होते. याप्रसंगी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, उमेश देशमुख या तरुणाने बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
गावात प्रतिकात्मक अंत्ययात्रा...
मराठा आरक्षण मिळावे ४० वर्षांपासून लढा सुरु आहे. लोकप्रतिनिधी आरक्षणावर एक शब्द बोलत नाहीत. त्यांचा निषेध नोंदविण्यासाठी गावातून प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून महामार्गावर विधिवत अंत्यविधी करून पुतळा जाळण्यात आला.