भूगर्भातील आवाज तपासणीसाठी हासोरीत दिल्लीचे येणार पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2022 09:27 PM2022-09-20T21:27:29+5:302022-09-20T21:27:43+5:30

ग्रामस्थांशी साधणार संवाद : भूकंपाची सूक्ष्म नोंद करणारे यंत्र गावात बसणार

A team from Delhi will come to Hasori for underground noise investigation | भूगर्भातील आवाज तपासणीसाठी हासोरीत दिल्लीचे येणार पथक

भूगर्भातील आवाज तपासणीसाठी हासोरीत दिल्लीचे येणार पथक

Next

आशपाक पठाण/ लातूर : निलंगा तालुक्यातील हासोरीसह परिसरातील काही गावांमध्ये मागील पंधरा दिवात जमिनीतून आवाज येत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. हा आवाज नेमका भूकंप आहे की अजून काही याची सुक्ष्मतपासणी करण्यासाठी दिल्लीचे पथक बुधवारी हासोरीत दाखल होणार आहे. तसेच भूकंपाची सूक्ष्म नोंद घेणारे यंत्रही याठिकाणी बसविले जाणार आहे. 

हासोरीत ६ सप्टेंबर रोजी रात्री १०.१२ मिनिटाला भूगर्भातून अचानक जोराचा आवाज झाल्याने भयभीत झालेले लोक रात्रभर रस्त्यावर बसून होते. अनेकांनी सुरक्षितस्थळी जाण्याासाठी धावपळ केली. तद्नंतर ८ व  १२ सप्टेंबर रोजी रात्री १०.०७ मिनिटाला हासोरीसह उस्तुरी, बडूर, हरीजवळगा, भुतमुगळी, बोळेगाव या गावातही भूगर्भातून मोठा आवाज झाला. आठवड्यात तीनवेळा भूकंपासारखे आवाज झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

जिल्हा प्रशासनाच्या पथकाने गावातील नागरिकांशी संवाद साधून माहिती घेतली. तसेच भूगर्भ शास्त्रज्ञांनीही ग्रामस्थांशी चर्चा केली. सदरील आवाज हा भूकंप नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी लोक भयभीत झाले आहेत. १९ सप्टेंबर रोजी निलंगा तालुक्यातीलच शिवणी कोतल, हाडगा, वडगाव येथे सकाळी १०.१९ मिनिटाला अचानकपणे भूगर्भातून आवाज आला. किल्लारीपासून जवळच असलेल्या गावांमध्ये आवाज येत असल्याने लोक भूकंपाच्या आवाजाची चर्चा करू लागले आहेत. दरम्यान, वारंवार जमिनीतून येत असलेला आवाज नेमका कशामुळे येतोय, याची पाहणी करण्यासाठी दिल्लीहून पथक आले असून बुधवारी दुपारी हासोरीत दाखल होणार आहे. 

किरकोळ धक्क्याचीही होणार नोंद...
हासोरी येथे भूकंपाची सूक्ष्म नोंद घेणारे यंत्र बसविण्यात येणार असून किरकोळ धक्का जाणवला तरी त्याची नोंद याठिकाणी होणार आहे. बुधवारी हे यंत्र बसविण्यात येणार आहे. पथकात  दिल्ली येथील राष्ट्रीय भूकंपशास्त्र विभागाचे वैज्ञानिक डॉ. अजयकुमार वर्मा, भारतीय हवामान खात्याचे डॉ. राजीवकुमार चावला यांच्यासह तिघांचा समावेश आहे. बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन विभागासोबत हे पथक चर्चा करणार असून तद्नंतर हासोरीत दाखल होणार असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी सांगितले.

Web Title: A team from Delhi will come to Hasori for underground noise investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.