कत्तलखान्याकडे पशुधन नेणारा टेम्पो पोलिसांनी पकडला
By राजकुमार जोंधळे | Published: July 31, 2023 07:11 PM2023-07-31T19:11:43+5:302023-07-31T19:11:55+5:30
लातूर जिल्ह्यातील घटना : १५ बैलांसह २२ लाखांचा मुद्देमाल जप्त
लातूर : जिल्ह्यातील पशुधनाची अवैध वाहतूक करणारा टेम्पो स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी पहाटेच्या सुमारास अहमदपूर येथे पकडला असून, टेम्पोसह १५ बैल असा २२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक लातूर जिल्ह्यात चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान, पथक सोमवारी पहाटे अहमदपूर येथे पोचले असता, पथकाला माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पशुधनाची अवैधरित्या वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी अडविले. टेम्पोची झाडाझडती घेतली असता त्यात १५ बैल (किंमत ७ लाख ५० हजार) आणि टेम्पो असा २२ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. टेम्पोत पशुधन कोंबून ते कत्तलीसाठी अवैधरित्या नेले जात असल्याचे उघड झाले. यावेळी अधिक विचारपूस केली असता, सलमान उस्मान शेख (३०, रा. घाटनांदुर ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर), जावेद बुडन शेख (३०, रा. बोरगाव सारणी, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) आणि जाकीर अब्दुल अजीज शहा ( २३, रा. बोरगाव सारणी, ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर) अशी नावे त्यांनी सांगितली आहेत. याबाबत अहमदपूर पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वातील राहुल सोनकांबळे, मनोज खोसे, राहुल कांबळे तसेच अहमदपूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी तोटेवाड यांच्या पथकाने केली आहे.