गंठण पळविणाऱ्या एकाला पकडले; ४ दुचाकी, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त
By राजकुमार जोंधळे | Published: December 1, 2023 08:02 PM2023-12-01T20:02:04+5:302023-12-01T20:02:37+5:30
लातुरात राजीव गांधी चौक परिसरात एक महिला सकाळी भाजीपाला खरेदी करून घरी जात हाेती. दरम्यान, दुचाकीवरील दाेघांनी महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावत पळ काढला.
लातूर : महिलांच्या गळ्यातील गंठण पळविणाऱ्या टोळीतील दाेघांना गंठण, चार दुचाकीसह शुक्रवारी पकडले असून, त्याच्याकडून ५ लाख २९ हजारांचा मुद्देमाल पाेलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई लातुरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने केली आहे.
लातुरात राजीव गांधी चौक परिसरात एक महिला सकाळी भाजीपाला खरेदी करून घरी जात हाेती. दरम्यान, दुचाकीवरील दाेघांनी महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावत पळ काढला. याबाबत शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या उलगड्यासाठी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेश दिले. त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, लातूर डिवायएसपी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप सागर यांच्या पथकाने आराेपींचा शाेध सुरू केला. पथकाने गुन्ह्याची माेडस आणि इतर बाबींचे विश्लेषण केले. शिवाय, खबऱ्याकडून माहिती मिळवली. दरम्यान, पाेलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा पुणे, हडपसर, टेंभुर्णी, निलंगा आणि लातुरातील विविध भागात शोध घेतला.
राहत्या ठिकाणाहून तिघांना उचलले...
सुशील सुनील नाथभजन (वय १९, रा. लातूर), आकाश ऊर्फ महेश रमेश टेळे (वय २५, रा. लातूर) याच्यासह एक अल्पवयीन आराेपीला त्याच्या राहत्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेत अधिक विचारपूस केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली देत महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावून पळाल्याचे सांगितले. त्याचबराेबर एमआयडीसी ठाण्याच्या हद्दीतूनही एका महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकाल्याची कबुली दिली. तर लातूर शहरातील विविध भागातून काही दुचाकी चोरल्याचेही कबूल केले. त्यांच्याकडून चोरलेले दोन गंठण, चार दुचाकी असा एकूण ५ लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई...
ही कारवाई पोलिस निरीक्षक दिलीप सागर, पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर, पोलिस निरीक्षक गोरख दिवे, रामचंद्र ढगे, भीमराव बेल्हाळे, युवराज गिरी, संजय कांबळे, महेश पारडे, गोविंद चामे, अभिमन्यू सोनटक्के, बालाजी कोतवाड, बळवंत भोसले, प्रशांत ओगले, विनोद चालवाड, काकासाहेब बोचरे, अमित लहाने यांच्या पथकाने केली आहे. तपास पोउपनि. पोगुलवार, अमलदार धैर्यशील मुळे करत आहेत.