आईला भेटून सासरी निघालेल्या मुलीच्या दुचाकीला ट्रकची जाेरदार धडक; जावई ठार
By राजकुमार जोंधळे | Published: October 11, 2023 06:38 PM2023-10-11T18:38:27+5:302023-10-11T18:40:06+5:30
मुलगी गंभीर : लातूर-नांदेड महामार्गावरील घटना...
चाकूर / वडवळ (जि. लातूर) : आईला भेटून गावाकडे निघालेल्या मुलीच्या दुचाकीला लातूर-नांदेड महामार्गावरील घरणी उड्डाणपुलानजीक ट्रकने जाेराची धडक दिली. या अपघातात जावई आणि मुलगी गंभीर जखमी झाले. उपचारासाठी दाेघांनाही लातूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. दरम्यान, उपचारादरम्यान जावयाची प्राणज्याेत मालवली. हा अपघात दुपारी ३:४५ वाजण्याच्या सुमारास घडला. हा अपघात एवढा भीषण हाेता की, ट्रकने दुचाकीला २० फुटांपर्यंत फरफटत नेले.
चाकूर तालुक्यातील घरणी उड्डाणपुलानजीक रस्त्यावर ट्रक-दुचाकीचा दुपारी ३:४५ वाजता अपघात झाला. या अपघातात लातूर येथून नांदेडकडे ट्रक (एम.एच. २६ बी.ई. ३६४९) निघाला हाेता. दरम्यान, सासरवाडी वडवळ नागनाथ येथून भीमाशंकर मुळे (वय ५०) आणि पत्नी अनिता मुळे (४२, दोघे रा. चांभरगा) हे मंगळवारी दुपारी दुचाकीवरून (एम.एच.२४ ए.सी. ३६०१) नळेगावकडे जात हाेते. लातूर-नांदेड महामार्गावरील घरणी उड्डाणपुलाच्या बोगद्यातून जाताना लातूरकडून येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जाेराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दाेघेही रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या दुचाकीला ट्रकने जवळपास २० फुटांपर्यंत फरफटत नेले. यामध्ये दाेघेही गंभीर जखमी झाले. दोघांच्या पायाला जबर मार लागला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, पोहेकॉ. ईश्वर स्वामी, रितेश आंधुरकर यांनी अपघातस्थळी भेट दिली. जखमींना तातडीने चाकूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथील डाॅक्टरांनी प्राथमिक उपचार करून, पुढील उपचारासाठी त्यांना लातूरला पाठवले. मात्र, उपचारादरम्यान भीमाशंकर मुळे यांची प्राणज्याेत मालवली, तर जखमी अनिता मुळे यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सासरवाडी येथून ते निघाले हाेते गावाकडे...
वडवळ नागनाथ हे अनिता मुळे यांचे माहेर आहे. त्या मंगळवारी पतीसह आईला भेटण्यासाठी दुचाकीवरून आल्या हाेत्या. दरम्यान, दुपारी ३:४५ वाजण्याच्या सुमारास वडवळ येथून आपल्या गावाकडे निघाले हाेते. दरम्यान, घरणी उड्डाणपुलानजीक ट्रकने त्यांच्या दुचाकीला जाेराची धडक दिली. यामध्ये अनिता मुळे आणि भीमाशंकर मुळे हे दाेघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी लातूरला पाठविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान जावई भीमाशंकर मुळे यांची प्राणज्याेत मालवली.