अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे लातूर जिल्ह्यातील शाळांना दोन दिवसांची सुट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 03:41 PM2022-07-14T15:41:22+5:302022-07-14T15:43:45+5:30
पहिली ते बारावीचा समावेश : १८ जुलैपासून नियमित वर्ग भरणार
लातूर : हवामान विभागाने जिल्ह्यात शुक्रवारी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्ह्यातील पहिली ते बारावीच्या वर्गाला १५ आणि १६ जुलै अशा दोन दिवसांची सुट्टी शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. १७ तारखेला रविवार असल्याने सोमवार १८ जुलै रोजी शाळा नियमित भरणार आहेत.
जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. दरम्यान, प्रादेशिक हवामान मुंबईच्या वतीने लातूर जिल्ह्यात १४ जुलैला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे संभाव्य परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील १ ली ते १२ वीच्या सर्व माध्यमाच्या, व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांनी १५ आणि १६ जुलै रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे. १७ जुलै रोजी रविवार असून, सलग तीन दिवस सुटी असणार आहे. दरम्यान, १८ जुलै सोमवारपासून नियमित वर्ग भरणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी आदेशात म्हंटले आहे.
शिक्षकांना शाळेत उपस्थित रहावे लागणार...
१५ आणि १६ जुलै रोजी शाळांना सुटी जाहीर करण्यात आली असली तरी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ लागु असल्यामुळे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना शाळेवर दिलेल्या वेळेत उपस्थित राहणे आवश्यक असल्याचेही आदेशात म्हंटले आहे.