श्वानांचे मुखवटे परिधान करुन लातुरात अनोखे आंदोलन; मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी
By हरी मोकाशे | Published: October 27, 2023 08:07 PM2023-10-27T20:07:48+5:302023-10-27T20:08:05+5:30
नागरिकांनी हातात बोलके झूल पकडत आता तरी करा बंदोबस्त! हद्दपार करुन दाखवा असे मनपा प्रशासनास आव्हान केले आहे.
लातूर : शहरातील मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा म्हणून मनसे जनहित आणि विधी सेवा व प्रभूराज प्रतिष्ठान यांच्या वतीने शुक्रवारी श्वानांचे मुखवटे परिधान करून मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करीत अनोखे आंदोलन करण्यात आले.
शहरात मोकाट श्वानांचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरुन ये- जा करावी लागत आहे तर बालकांना खेळणे कठीण झाले आहे. काही वेळेस श्वानांनी बालकांचा चावा घेतल्याच्या घटनाही घडल्या आहेत. सकाळी व रात्रीच्या वेळी फिरायला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मोकाट श्वानांची भीती वाटू लागली. हे श्वान वाहन चालकांचाही पाठलाग करीत आहेत. त्यामुळे काहीजण जखमी झाले आहेत. ही बाब महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊनही दुर्लक्ष करण्यात येत आहे.
याकडे मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ॲड. अजय कलशेट्टी यांच्या नेतृत्वात नागरिकांनी हातात बोलके झूल पकडत आता तरी करा बंदोबस्त! हद्दपार करुण दाखवा असे मनपा प्रशासनास आव्हान केले आहे. यावेळी ॲड. अजय कलशेट्टी, ॲड. सुरेश सलगरे, ॲड. कलिम मणियार, ॲड. कल्पना भुरे, ॲड. अशोक सोनसाळे, ॲड. शीतल सलगरे, डॉ. संजय जमदाडे, शिरीष माळी, हुसेन पठाण, धनंजय मुंडे, प्रशांत रुपनर, अनिल जाधव, गोपाळ खंडागळे, तानाजी जाधव, साईनाथ रासे, सतीश पवार, हेमंत वडणे, आशुतोष बाजपाई, अंगद कोंपले, विलास भुमकर, सचिन गोलावार, संजय बागडे, वाहेदअली सय्यद आदी उपस्थित होते.