एका हातात पेग दुसऱ्या हातात गावठी कट्ट्याचा व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी दोघांना उचलले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 06:45 PM2024-09-30T18:45:44+5:302024-09-30T18:46:56+5:30
साेशल मीडियात शेअर केलेला व्हिडिओ पोलिसांपर्यंत गेला अन् गावठी कट्ट्यासह अडकला!
लातूर : साेशल मीडियामध्ये दारू पिताना, हातात गावठी कट्टा असलेला व्हिडीओ व्हायरल करणे चांगलेच महागात पडले असून, गावठी कट्टा विक्री करण्यासाठी सुतमील राेडवरील सिद्धार्थ चाैकात थांबलेल्या दाेघांना दुचाकीसह पाेलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना शनिवारी दुपारी ४:२० वाजता घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात रात्री उशिरा दाेघांविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले की, लातुरातील काेकाटेनगर आणि एलआयसी काॅलनीत राहणाऱ्या दाेघा अल्पवयीन मुलांपैकी एकाने हातात गावठी कट्टा घेत, दारू पितानाचा व्हिडीओ तयार करून ताे साेशल मीडियात व्हायरल केला हाेता. दरम्यान, हा व्हिडीओ पाेलिसांच्या हाती लागल्यानंतर त्यांनी यातील दाेघांचा शाेध घेण्यास प्रारंभ केला. शनिवारी दुपारी पाेलिसांना खबऱ्याने माहिती दिली. दाेन अल्पवयीन मुले हे सुतमील राेडवरील सिद्धार्थ चाैकात गावठी कट्टा विक्री करण्यासाठी दुचाकीसह थांबले आहेत, या माहितीची खातरजमा करून पाेलिस पथकाने तातडीने घटनास्थळ गाठले. चाैकात थांबलेल्या दाेघा संशयितांना दुचाकीसह ताब्यात घेतले. झाडाझडती घेत अधिक चाैकशी केली असता त्यांच्याकडून गावठी कट्टा आणि दुचाकी (एम.एच. २४ बी.वाय. ५३६३) जप्त करण्यात आली.
याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात पाेलिस उपनिरीक्षक रामचंद्र ढगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दाेघा अल्पवयीन मुलांविराेधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पाेलिस निरीक्षक सुधाकर चव्हाण, पाेलिस अंमलदार महेश पारडे, अभिमन्यू साेनटक्के, ओम बेस्के यांच्या पथकाने केली.