हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन; गेल्या तीन पिढ्यांपासून साजरा करतात एकत्र मोहरम सण
By संदीप शिंदे | Published: July 17, 2024 06:36 PM2024-07-17T18:36:51+5:302024-07-17T18:37:43+5:30
मोहरम सणानिमित्ताने उभारण्यात आलेल्या डोल्याची गावभरात मोठ्या उत्साहात वाजत गाजत मिरवणूक काढली जाते
निलंगा : तालुक्यातील मसलगा येथे मोहरम सण बुधवारी उत्साहात साजरा करण्यात आला. गेल्या तीन पिढ्यांपासून येथील हिंदू-मुस्लीम बांधव एकत्र येऊन मोहरम सण उत्साहात साजरा करतात. सणांमध्ये डोल्याचे विशेष आकर्षण गावकऱ्यांना असते. त्यामुळे गावातील सर्वधर्मीय नागरिक स्वयंस्फूर्तीने या सणानिमित्ताने एकत्र येतात. एकमेकांशी संवाद साधतात, परिणामी, गावामध्ये हिंदू मुस्लिम बांधवाचे एकतेचे दर्शन पहावयास मिळते.
हा डोलाची परिसरातील नागरिकांना विशेष आकर्षण असते. १० जुलै रोजी बसवण्यात आलेल्या सवारीची बुधवारी सांगता करण्यात आली. मोहरम सणानिमित्ताने उभारण्यात आलेल्या डोल्याची गावभरात मोठ्या उत्साहात वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. खांद्यावरती डोला घेऊन वाद्याच्या तालात गावभरातून मिरवणूक काढण्यात येते. विशेष म्हणजे मिरवणुकीमध्ये गावातील सर्व धर्मातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथील सुलतान सय्यद, दस्तगीर शेख बालाजी पिंड, नागनाथ नरहरे, शिवाजी पवार, हनुमंत पिंड गुरुनाथ पिंड, चंद्र पवार, राजेश पिंड, गोविंद पवार, तानाजी शिंदे, गफूर सय्यद, प्रभू जाधव, गोविंद शिंदे, ओम पाटील, जयपाल सलघंटे, ओमकार पवार, नामदेव चामे, सुभाष जाधव राम बनसोडे आदींसह गावातील नागरिक एकत्र येत डोल्याची विशेष बांधणी करतात. वादक म्हणून उत्तम शिंदे व हरी शिंदे हे उपस्थित होते.
आठ दिवस डोला बनविण्याचे काम...
मोहरम सण तोंडावर येताच डोल्याच्या विशेष बांधणीसाठी कपडा, दोरा, जर, आरशे, बिलवरहंडी आधी साहित्य पासून कलाकुसरणी अतिशय साचेबद्ध पद्धतीने कापडी सजावटीसह डोला बनवण्यात येतो. हे काम जवळपास आठवडाभर चालत असते. मोहरम सणानिमित्ताने उभारण्यात आलेल्या डोल्याची उत्साहात मिरवणूक काढत खांद्यावरती डोला घेऊन वाद्याच्या तालात गावभरातून मिरवणूक काढण्यात येत असून, यामध्ये नागरिक सहभागी होतात.