पाेलीस असल्याची बतावणी करुन महिलेचे दोन लाखांचे दागिने लुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 05:51 PM2022-07-20T17:51:41+5:302022-07-20T17:54:18+5:30
लातुरातील घटना : इथे फार माेठी चाेरी झालेली आहे. मी पाेलीस आहे, असे सांगून दागिने केले लंपास
लातूर : पाेलीस असल्याची बतावणी करुन, एका महिलेच्या गळ्यातील १ लाख ९५ हजारांचे दागिने हातचालाखिने पळविल्याची घटना लातूर शहरातील औसा राेड परिसरात भरदिवसा घडली. याबाबत विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात बुधवारी अज्ञाताविराेधात गुन्हा नाेंद करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी वेदावती समीर नटवे (रा. लातूर) या रविवार, १७ जुलै राेजी औसा राेडवरील राजीव गांधी चाैकाकडे भाजीपाला खरेदी करण्यासाठी पायी जात हाेत्या. दरम्यान, बांधकाम भवनच्य प्रवेशद्वारानजीक एकजण त्यांच्याकडे आला. मावशी तुमच्याकडे असलेले साेन्याचे दागिने काढून घ्या, अन्यथा साहेब तुम्हाला दंड करतील. इथे फार माेठी चाेरी झालेली आहे. मी पाेलीस आहे, असे सांगून त्यांच्याकडील ६० ग्रॅम वजनाच्या दाेन पाटल्या आणि ३० ग्रॅम वजनाची साेन्याची चैन असा जवळपास १ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज कागदामध्ये बांधून त्यांच्या हातात दिले.
मात्र, हातचालाखीने हे दागिने त्या अज्ञाताने लंपास केले. थाेड्या वेळाने फिर्यादी वेदावती नटवे यांनी ताे कागद उघडून पाहिला असता, त्यांना घामच फुटला. या कागादात केवळ एक स्टीलचा, लाेखंडी कडा, आणि बनावट पिवळ्या रंगाची बांगडी आढळून आली.