निलंग्यात साकारले छत्रपती शिवरायांचे साडेअकरा हजार स्केअर फुटाचे विश्वविक्रमी तैलचित्र
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 08:18 PM2022-02-18T20:18:38+5:302022-02-18T20:20:13+5:30
गेल्या पाच वर्षांपासून अक्का फाऊंडेशनच्या वतीने निलंग्यात शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे.
निलंगा (जि. लातूर) : छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वविक्रमी, जगातील सर्वात मोठे साडेअकरा हजार स्केअर फुट आकाराचे तैलचित्र निलंग्यात साकारण्यात आले असून जयंतीच्या पूर्वसंध्येला माजी खा. रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी निलंगा पंचक्रोषितील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने सारा परिसर दणाणून गेला होता.
माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, माजी उपनगराध्यक्ष मनोज कोळ्ळे, डॉ. लालासाहेब देशमुख, प्रा. दत्ता शाहीर, शेषराव ममाळे आदींची यावेळी उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणावर भव्य तैलचित्राचे अनावरण करून शिवभक्तांना अभिवादनासाठी खुले करण्यात आले. शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रक्तदान महायज्ञ तसेच ३९१ रोपांची लागवड व संवर्धन आणि पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे.
दरम्यान, गेल्या पाच वर्षांपासून अक्का फाऊंडेशनच्या वतीने निलंग्यात शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. सुरुवातीस भव्य रांगोळी साकारण्यात आली होती. त्यानंतर दोन लाख स्क्वेअर फुट आकाराची छत्रपती शिवरायांची हरित शिवप्रतिमा साकारण्यात येऊन विश्व रेकॉर्ड करण्यात आले होते. गेल्या वर्षी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला होता.
तैलचित्राचे काम १६ दिवस...
छत्रपती शिवरायांचे साडेअकरा हजार स्केअर फुटाचे तैलचित्र हे लातुरातील कलाकार मंगेश निपाणीकर यांनी साकारले असून त्यासाठी १६ दिवस लागले आहेत. यासाठी ४५० लिटर रंगाचा वापर करण्यात आला आहे.