टेम्पाे-माेटारसायकल अपघातात गंभीर जखमी झालेला तरुण ठार!
By राजकुमार जोंधळे | Published: December 26, 2022 08:18 PM2022-12-26T20:18:22+5:302022-12-26T20:18:44+5:30
लातुरातील घटना : महात्मा बसवेश्वर चाैक परिसरातील थरार...
लातूर : टेम्पाे आणि माेटारसायकलच्या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना लातुरातील राजीव गांधी चाैक ते महात्मा बसवेश्वर चाैक दरम्यान रिंगराेडवर साेमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, डाॅक्टरांनी त्यास मृत घाेषित केले. याबाबत विवेकांनद चाैक पाेलिस ठाण्यात साेमवारी सायंकाळी घटनेची नाेंद करण्यात आली आहे.
पाेलिसांनी सांगितले की, लातुरातील शिवनेरी गेट परिसरात वास्तव्याला असलेला तरुण राहुल पुखराज मुंदडा (वय ३५) हा आपल्या माेटारसायकलवरून राजीव गांधी चाैक येथून महात्मा बसवेश्वर चाैकाकडे साेमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास येत हाेता. दरम्यान, महात्मा बसवेश्वर चाैकानजीक आल्यानंतर त्याच्या माेटारसायकलचा आणि टेम्पाेचा (एमएच २४ एयू ०३७६) अपघात झाला. या अपघातामध्ये माेटारसायकलवर असलेला रहुल मुंदडा हा गंभीर जखमी झाला. घटनास्थळी दाखल झालेल्या नागरिकांनी त्यास शासकीय सर्वाेपचार रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल केले. मात्र, तेथील डाॅक्टरांनी राहुल मुंदडा यांना मृत घाेषित केले. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात डाॅ. गाैरव नळेगावकर यांनी दिलेल्या माहितीवरून अपघाताची नाेंद केली आहे. तपास व्ही. एस. फुलारी करीत आहेत.
एकेरी मार्गावरून वाहतूक अन् अपघात...
अपघातात माेटारसायकलचे नुकसान झाले असून, घटनास्थळी पाेलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी भेट दिली. सध्याला या मार्गाचे काम सुरू असून, एकेरी बाजूने वाहतूक साेडण्यात आली आहे. छाेट्या वाहनांबराेबरच माेठ्या अन् अवजड वाहनांची या मार्गावर वर्दळ आहे. याच गर्दीच्यावेळी साेमवारी दुपारी अपघाताचा हा थरार घडला.
अपघातानंतर झाली वाहतूक काेंडी...
साेमवारी दुपारी टेम्पाे आणि माेटारसायकलचा अपघात झाला. त्यानंतर काही वेळ वाहतूक काेंडी झाली. स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती विवेकानंद चाैक पाेलिसांना दिली. घटनास्थळी पाेलिस दाखल हाेत वाहतूक काेंडी दूर केली. या अपघातातील दाेन्ही वाहने पाेलिसांनी ताब्यात घेतली आहेत. याबाबत पाेलिसांत घटनेची नाेंद करण्यात आली आहे.
टेम्पाेचालक स्वत: ठाण्यात हजर...
अपघाताच्या घटनेनंतर टेम्पाेचालक स्वत: विवेकानंद चाैक पाेलिस ठाणे गाठत हजर झाला. दरम्यान, आपल्या ताब्यातील टेम्पाे त्याने ठाण्याच्या आवारात आणून थांबविला, अशी माहिती पाेलिसांनी दिली. याबाबत पाेलिस ठाण्यात प्राथमिक नाेंद केली असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असेही पाेलिसांनी सांगितले.