पाण्याचा अंदाज चुकला अन् मित्रांसाेबत नदीपात्रात पोहायला गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू
By संदीप शिंदे | Published: September 5, 2024 07:21 PM2024-09-05T19:21:01+5:302024-09-05T19:21:35+5:30
तरुण पाण्यात बुडाल्याची वार्ता गावात कळाल्यानंतर अनेक तरुणांनी नदीपात्रात पोहून शोध घेतला.
हाळी हंडरगुळी : उदगीर तालुक्यातील हाळी येथील महाविद्यालयीन मित्रांसोबत पोहायला गेलेल्या युवकास पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला आहे. ही घटना बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली असून, शोधानंतर गुरुवारी सायंकाळी पाच वाजता तरुणाचा मृतदेह सापडला.
हाळी येथील मोहम्मद जुनेद मोहम्मद जुना शेख (१९) हा बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मित्रांसोबत गावालगत असलेल्या तीरू नदीपात्रात पोहण्यासाठी गेला. मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदी प्रवाहाच्या पाण्यात बुडाला. सोबतच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले, मात्र तो हाती लागला नाही. तरुण पाण्यात बुडाल्याची वार्ता गावात कळाल्यानंतर अनेक तरुणांनी नदीपात्रात पोहून शोध घेतला. पण तो सापडला नाही.
दरम्यान, उदगीर येथील अग्निशामक दलांच्या जवानांना पाचारण केले. गुरुवारी पुन्हा शोध घेतला असता, सायंकाळी पाच वाजता मृतदेह सापडला. हंडरगुळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तहसीलदार राम बोरगावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी कल्याण पाटील, मंडळ अधिकारी गणेश हिवरे, तलाठी कुलदीप गायकवाड, तलाठी तानाजी शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.