तीन वर्षांपासून आधार मशीन धूळखात! ४७ हजार विद्यार्थ्यांची आधार जोडणी रखडली

By संदीप शिंदे | Published: November 17, 2022 07:52 PM2022-11-17T19:52:35+5:302022-11-17T19:53:52+5:30

आम्ही आधार कोठे काढायचे? विद्यार्थी, पालकांचे तालुक्याला हेलपाटे

Aadhaar machine in dust for three years! Aadhaar connection of 47 thousand students stopped | तीन वर्षांपासून आधार मशीन धूळखात! ४७ हजार विद्यार्थ्यांची आधार जोडणी रखडली

तीन वर्षांपासून आधार मशीन धूळखात! ४७ हजार विद्यार्थ्यांची आधार जोडणी रखडली

Next

लातूर : स्टूडंट पोर्टलमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या नोंदविताना संबधित विद्यार्थ्याचा आधार क्रमांकसुद्धा नोंदवावा लागतो. मात्र, अनेक विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नसल्यामुळे शिक्षकांसमोर अडचणी निर्माण होतात. या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना आधार क्रमांक देण्यासाठी प्रत्येक तालुक्याला दोन आधार मशीन २०१९ मध्ये देण्यात आल्या होत्या. प्रारंभी दोन ते तीन महिने या मशीन सुरू होत्या. मात्र, आता या मशीन सध्या धूळखात असून, विद्यार्थ्यांना आधारसाठी तालुक्याला हेलपाटे मारावे लागत आहेत.

विद्यार्थ्यांची पटसंख्या खरी नोंदविली जावी, यासाठी शिक्षण विभागाने पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना आधार क्रमांक बंधनकारक केला आहे. विद्यार्थ्यांची स्टूडंट पोर्टलवर नोंद झाली नाही तर शाळेतील पटसंख्या कमी दिसते. त्यामुळे शिक्षकांवर अतिरिक्त ठरण्याची वेळ येते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आधार काढण्यासाठी शिक्षण विभागाने २०१९ मध्ये प्रत्येक तालुक्याला दोन आधार मशीन दिले होते. यासाठी तज्ञांचीही नेमणूक करण्यात आली होती. मात्र, दोन ते तीन महिने काम चालल्यावर आधार मशीन संबंधित गटशिक्षणाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आल्या. अद्यापही या मशील याच कार्यालयात पडून असून, जिल्ह्यात अद्यापही ४७ हजार विद्यार्थ्यांची आधार क्रमांक काढणे बाकी आहे. त्यामुळे आधारसाठी या विद्यार्थ्यांना तालुकास्तरावर हेलपाटे मारावे लागत असून, वेंटिंगमुळे गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याची ओरड आहे.

जिल्ह्यात केवळ ५५ आधार मशीन...
जिल्ह्यात सध्या ५५ ठिकाणी आधार क्रमांक काढण्यासाठी मशीन आहेत. प्रत्येक केंद्रावर एका दिवसात केवळ ४० आधारच काढता येतात. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना गावातून तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. तेथेही तांत्रिक कारण देत परत पाठविले जाते. त्यामुळे पालकांमधूनही नाराजी व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात चार लाख ८४ हजार विद्यार्थी...
जिल्ह्यात चार लाख ८४ हजार विद्यार्थी असून, यापैकी चार लाख ३७ हजार विद्यार्थ्यांनी शाळेत आधार क्रमांक दिला आहे. तर ४७ हजार विद्यार्थ्यांनी क्रमांक दिलेला नाही. गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील आधार मशीन प्रत्येक शाळा केंद्रावर दिल्यास विद्यार्थ्यांना शाळेतच आधार काढता येईल. परिणामी, पोर्टलवर वेळेत नोंदणीही होण्यास मदत होईल.

तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करावे...
विद्यार्थ्यांना आधार क्रमांक सक्तीचा असल्याने नोंदणी व अद्ययावतीकरण करण्यासाठी तालुका, केंद्रस्तरावर आधार मशीन, मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. याबाबत शिक्षण मंत्र्यांना निवेदन देण्यात आले असून, मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांना शाळेतच आधार काढता येईल.
- महादेव खिचडे, प्राथमिक शिक्षक संघ

शासनस्तरावरून निर्णय होणार...
तालुकास्तरावर आधार मशीन देण्यात आल्या होत्या. मात्र, सध्या मनुष्यबळ नसल्याने या मशीन संबधित तालुका कार्यालयात आहेत. आधार मशीनसाठी मनुष्यबळ लागते. त्यासाठी राज्यस्तरावरून कंत्राट काढण्यात येते. त्यानुसार संबंधित एजन्सी काम सुरू करते. याबाबत राजस्तरावरून निर्णय होईल.
- वंदना फुटाणे, प्राथमिक शिक्षणाधिकारी

Web Title: Aadhaar machine in dust for three years! Aadhaar connection of 47 thousand students stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.