लातूर जिल्ह्यातील ९५१ गावांची अंतिम पैसेवारी ४३ पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 06:28 PM2019-12-16T18:28:41+5:302019-12-16T18:30:12+5:30
लातूर तालुक्याची ३६ पैसे तर देवणी तालुक्याची ४८ पैसे आणेवारी
- संदीप शिंदे
लातूर : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ६ लाख ५३ हजार ४७ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते. त्यापैकी ५ लाख ७४ हजार ९२१ हेक्टरवर पेरणी झाली होती. मात्र पावसाने सुरुवातीपासूनच पाठ फिरवल्याने पिके करपून गेली होती. महसूल विभागाच्या वतीने जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली असून, ९५१ गावांची पैसेवारी ४३ पैसे आली आहे. यामध्ये लातूर तालुक्याची ३६ पैसे सर्वात कमी तर अहमदपूर आणि देवणी तालुक्याची पैसेवारी ४८ पैसे आली आहे.
पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने गतवर्षी खरीप आणि रब्बी हंगाम हातून गेला होता. यावर्षीही खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाला नव्हता. हंगामासाठीसोयाबीन, ज्वारी, तूर, मूग, उडीद ही प्रमुख पिके आहेत. मात्र पावसभावी पिके जळून गेली होती. त्यामुळे महसूल प्रशासनाच्या वतीने नजर अंदाज पैसेवारी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये अहमदपूर तालुक्यातील १२४ गावांची पैसेवारी ५० पैश्यांपेक्षा जास्त आली होती. खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ६ लाख ५३ हजार ४७ हेक्टर प्रस्तावित होते. त्यापैकी ५ लाख ७४ हजार ९२१ हेक्टरवर पेरा झाला होता. तर ७८ हजार १२६ हेक्टर क्षेत्र पेरणीविना पडीक राहिले होते. एकूण ९५१ गावांची पैसेवारी ४३ पैसे आली आहे. त्यामध्ये लातूर तालुक्यातील १२३ गावांची ३६ पैसे, औसा १३३ गावांची ३८, रेणापूर तालुक्यातील ७६ गावांची ४०, उदगीर तालुक्यातील ९९ गावांची ४५, जळकोट तालुक्यातील ४७ गावांची ४३, चाकूर तालुक्यातील ८५ गावांची ४०, निलंगा तालुक्यातील १६२ गावांची ४७, देवणी तालुक्यातील ५४ गावांची ४८ तर शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ४८ गावांची ४७ पैसे आणेवारीचा समावेश आहे. महसुल विभागाच्या वतीने मंडळनिहाय पिकांची माहिती आणि उत्पादकतेची माहिती घेऊन अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. अंतिम पैसेवारी १५ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आली. त्यावरच पिकविमा आणि इतर गोष्टी अवलंबून राहतात. अशी माहिती महसूल विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
तीन वेळेस जाहीर होते पैसेवारी...
महसूल विभागाच्या वतीने खरीप हंगामातील पिकांच्या परिस्थितीवर तीन वेळेस पैसेवारी जाहीर केली जाते. त्यामध्ये नजर अंदाज पैसेवारी, सुधारित नजर अंदाज पैसेवारी आणि अंतिम पैसेवारीचा समावेश असतो. जिल्ह्यातील दहाही तालुक्याची सरासरी ४३ पैसे आली आहे. सुरुवातील अहमदपूर तालुक्यातील १२४ गावांची पैसेवारी ५० पैश्यांपेक्षा अधिक आली होती. मात्र, पीक उत्पादनात घट झाल्याने पैसेवारी कमी झाली असल्याचे सांगण्यात आले.
पैसेवारी जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा...
महसूल विभागाच्या वतीने पीक परिस्थितीनुसार पैसेवारी जाहीर करण्यात येते. सप्टेंबर, आॅक्टोबर, आणि डिसेंम्बर महिन्यातील पैसेवारीवर पीकविमा यासह अनेक बाबी अवलंबून असतात. ५० पैश्यांपेक्षा कमी पैसेवारी आल्याने शासनाकडून नुकसान भरपाईसह अन्य सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे