लातूर जिल्ह्यातील आशिवच्या कास्ती कोथिंबीरला जीआय मानांकन
By संदीप शिंदे | Published: December 5, 2023 04:57 PM2023-12-05T16:57:21+5:302023-12-05T16:57:59+5:30
आशिव गावात कास्ती कोथिंबीर दरवर्षी १५० ते १७५ एकरवर लागवड केली जाते.
बेलकुंड : औसा तालुक्यातील आशिव व परिसरातील २० ते २५ गावांत गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी कोथिंबीरचे उत्पादन घेतात. परिसरातील कोथिंबीर इतर कोथिंबीरच्या तुलनेत अधिक सुगंधित असल्याने बाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळे आशिव येथील कास्ती कोथिंबीर शेतकरी उत्पादक संघाने कोथिंबीरला जीआय मानांकन मिळावे म्हणून प्रयत्न केले होते. त्यास यश आले असून, जीआय मानांकन जाहीर करण्यात आले आहे.
आशिव गावात कास्ती कोथिंबीर दरवर्षी १५० ते १७५ एकरवर लागवड केली जाते. सध्या अवकाळी पावसाचा सामना येथील शेतकरी करीत आहे. वर्षातून दोन ते तीन वेळेस कोथिंबीरचे पीक घेता येते. कास्ती या वाणाचे वैशिष्ट्य असे की याचा सुगंध अन चव खास असल्याने महाराष्ट्रासह तेलंगणा, ओडिसा, पश्चिम बंगाल या अन्य राज्यात मोठी मागणी आहे. पेरणीनंतर अवघ्या ४० ते ४५ दिवसांत हे पीक काढायला येते. शिवाय बाजारात तेजी असल्यास शेतकऱ्याला एकरी दीड लाखांपर्यंत दर मिळतो. त्यामुळे पारंपरिक पिकाबरोबरच या पिकांकडे परिसरातील शेतकऱ्यांचा कल आहे. आता जीआय मानांकन मिळाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात आपले पीक विकता येणार आहे.