विवाहितेचे शेतातून अपहरण, लॉजवर नेऊन केला अत्याचार; दोघांना अटक
By राजकुमार जोंधळे | Published: January 27, 2023 01:04 PM2023-01-27T13:04:37+5:302023-01-27T13:04:52+5:30
अत्याचार प्रकरणी दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे
औसा (जि. लातूर) : तालुक्यातील जमालपुर शिवारातून एका विवाहीतेला दोघानी पळवून नेत औशातील एका लॉजवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली. यावेळी पीडित विवाहितेचा मारहाणही करण्यात आली आहे. याबाबत पिडीत महिलेच्या तक्रारीवरुन औसा पोलिस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांना औसा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
पोलिसांनी सांगितले, बुधवारी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर विष्णू सुर्यवंशी (रा.जमालपूर) आणि अनोळखी कारचालकांने जमालपूर शिवारातून एका विवाहीतेस कारमधून जबरदस्तीने पळवून नेत, औसा येथील एका लॉजवर आणले. तेथे तिच्या गालावर,ओठावर आणि इतरत्र ठिकाणी जबर मारहाण केली. यावेळी तिच्यावर अत्याचार करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडित विवाहित महिलेला लातूरात सोडले. याबाबत पीडित विवाहित महिलेने रात्री उशीरा औसा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक शंकर पटवारी करत आहेत.
पंधरा दिवसापुर्वीच अवैध लॉजच्या विरोधात उठाव...
जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात औशातील महिला, युवक आणि शेकडो नागरिकांनी लॉजवरील गैरकृत्याच्या विरोधात निवेदन दिले होते. सदरचे लॉज हे अनाधिकृत असून, पालिकेचा एकालाही परवाना नाही. या लॉजवर चुकीचे व्यवसाय केले जात आहेत. असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. याबाबत प्रशासनाला वारंवार निवेदन देवूनही कारवाई होत नसल्याने अवैध धंद्यांचे पेव फुटले आहे.