लातुरात दिवसाढवळ्या तरुणीचे सिनेस्टाईल अपहरण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2017 09:18 PM2017-01-20T21:18:09+5:302017-01-20T21:18:09+5:30
येथील एमआयडीसी परिसरातील वसतीगृहातील एका तरुणीचा चार अज्ञात आरोपींनी पाठलाग करत सिनेस्टाईल अपहरण केल्याच्या घटनेने लातुरात खळबळ उडाली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 20 : येथील एमआयडीसी परिसरातील वसतीगृहातील एका तरुणीचा चार अज्ञात आरोपींनी पाठलाग करत सिनेस्टाईल अपहरण केल्याच्या घटनेने लातुरात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली.
एमआयडीसी परिसरातील असलेल्या एका वसतीगृहावर अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या तीस वर्षीय तरुणीचा चार जणांनी पांढ-या कारमधून पाठलाग करुन चक्क सिनेस्टाईल अपहरण केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. ती मुलगी दुचाकीवरुन वसतीगृहाबाहेर पडल्यानंतर या चौघांनी तिचा पाठठलाग केला. आपला कारमधील काही तरुण पाठलाग करत असल्याचा संशय आल्यामुळे तिने स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पांढºया कारमधून पाठलाग करणा-यांनी तिला अभिनव महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळून उचलून आपल्या कारमध्ये कोंबले आणि कार कळंब रोडच्या दिशेने सुसाट गेली. पुढे ही कार कुठे गेली याचा ठावठिकाणा मात्र, पोलिसांना लागला नाही. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
लोक धावेपर्यंत अपहरणकर्ते पळाले !
सायंकाळच्या दरम्यान, या परिसरात कोणीच नसल्याने या अपहरणकर्त्यांना कोणीच रोखू शकले नाही. काही लोक तिथे येईपर्यंत ही कार सुसाट निघून गेली होती. या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरुन एक दुचाकी (एम. एस. २८ ए. पी. ३१९१) ताब्यात घेतली आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बावकर यांनी तातडीने दोन पोलिस गाड्या ज्या दिशेने अपहरणकर्त्यांची कार गेली त्या मार्गावर पाठविल्या. याशिवाय तातडीने शहराबाहेर नाकाबंदी केली आहे.
अपहृत मुलगी पोलिस कर्मचा-याची ?
पोलिसांनी घटनास्थळावरुन ताब्यात घेतलेल्या स्कुटीवर समोरील भागावर पोलिस खात्याच्या बोधचिन्हाचे स्टिकर चिकटवलेले आहे. त्यामुळे ही मुलगी पोलिस कर्मचा-याची असवी असा प्राथमिक अंदाज एमआयडीसी पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेनंतर पोलिसांनी या कारचा माग काढला, मात्र, त्यांच्या हाती ही कार आणि चार अपहरणकर्ते लागले नाहीत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.