कारखान्याकडून २४ लाखांची उचल घेऊन फरार; सहा महिन्यांनी अडकला पोलिसांच्या जाळ्यात
By संदीप शिंदे | Published: January 13, 2023 06:15 PM2023-01-13T18:15:26+5:302023-01-13T18:16:56+5:30
कामगारांचा पुरवठा न करताच आरोपी फरार झाला.
निलंगा (जि.लातूर) : ऊस तोडणीसाठी कामगार घेऊन येतो, म्हणून २४ लाखांची उचल घेऊन फरार झालेल्या आरोपीस निलंगा पोलिसांनी सहा महिन्यानंतर बुधवारी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, आरोपीस निलंगा न्यायालयापुढे गुरुवारी हजर केले असता पाच दिवसांची पाेलिस कोठडी सुनावण्यात आली.
पोलिसांनी सांगितले, निलंगा येथील अनिल बोयतराम अग्रवाल यांना ऊसतोड कामगार पुरवठा करतो म्हणून भगवंत यशवंत मैंद (रा. लोणगाव ता. माजलगाव) याने जून २०२२ मध्ये २४ लाख रुपयांची उचल घेतली. मात्र, कामगारांचा पुरवठा न करताच आरोपी फरार झाला. याप्रकरणी अनिल अग्रवाल यांनी निलंगा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन भगवंत मैंद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस आरोपीचा शोध घेत होते, मात्र, तो फरार पोलिसांना चकमा देत होता.
अखेर ११ जानेवारी रोजी निलंगा पोलिसांना खबर मिळताच सापळा रचून त्यांनी सांगली परिसरातील इस्लामपूर जवळील कृष्णा नदीवरच्या पुलावर भगवंत मैंद यास अटक केली. १२ रोजी आरोपी निलंगा न्यायालयापुढे हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक बी.आर. शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रताप गर्जे हे करत आहेत.