औसा-उमरगा महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात, एक जागीच ठार तर ९ जखमी
By राजकुमार जोंधळे | Published: September 3, 2023 09:04 PM2023-09-03T21:04:19+5:302023-09-03T21:04:28+5:30
आ. अभिमन्यू पवार यांनी जखमींना तातडीने स्वतःच्या वाहनातून लातूर येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
औसा (जि. लातूर) : औसा-उमरगा महामार्गावरील दावतपूर पाटीनजीक भरधाव असलेल्या तीन कारचा विचित्र अपघात झाला. रविवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात घडला. यात एक जागीच ठार झाला, तर इतर ९ जण जखमी झाले. यात तिन्ही वाहनांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लामजना येथून कार (क्र. एमएच २४ एएस ६८५६) औशाच्या दिशेने निघाली हाेती. दरम्यान, दावतपूर पाटी ते करजगाव पाटी मार्गावर टेम्पाेला ओव्हरटेक करताना समाेरून भरधाव येणाऱ्या कारला (क्र. एमएच ३२ सी ३८३७) जोराची धडक दिली. यावेळी दोन्ही अपघातग्रस्त कारवर पाठीमागून येणारी कार (क्र. एमएच २४ एएस ७४६५) धडकली. हा अपघात रविवारी सांयकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडला.
या विचित्र अपघातात कारमधील डाॅ. मल्लिकार्जुन हुलसुरे (वय ७८, रा. पत्तेवार काॅलनी, लातूर) हे जागीच ठार झाले. तर अन्य ९ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये शिवराज जिरगे (६५, रा. साईरोड, लातूर), सपना साळुंके (३८, रा. जुना औसा रोड, लातूर), मल्लिकार्जुन शंकरप्पा (७५, रा. पत्तेवार कॉलनी, लातूर), जिरगे (५५ रा. लातूर), ज्ञानेश्वर गोंडाळे, मीनाक्षी गोगलगावे (४०), गुंडू गोपाळ गोगलगावे (७५), संजय गुंडू गोगलगावे (४४ ,सर्व रा. कालदेव लिंबाळा, ता. उमरगा, जि. धाराशिव), रघुनाथ दत्ता मुदाळे (२९ रा. पेठसांगवी, ता. उमरगा), गणेश गतोटे (रा. निलंगा) यांचा समावेश आहे.
आमदार अभिमन्यू पवार यांची तत्परता...
आ. अभिमन्यू पवार किल्लारीचा कार्यक्रम आटाेपून औशाकडे निघाले हाेते. दरम्यान, दावतपूर पाटीनजीक अपघातस्थळी थांबून त्यांनी जखमींना तातडीने स्वतःच्या वाहनातून लातूर येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.