सत्संगास निघालेल्या भाविकांच्या मिनी बसला अपघात; १३ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 07:12 PM2019-11-23T19:12:57+5:302019-11-23T19:13:13+5:30
हरियाणातील हिसार येथील बाबा रामपाल यांच्या आश्रमात सत्संगास जाणाऱ्या मिनी बसला राज्यस्थानमधील किसनगड ते हनुमानगड महामार्गावरील कालाभटजवळ शनिवारी अपघात होऊन १३ भाविक ठार झाले आहे.
औसा: हरियाणातील हिसार येथील बाबा रामपाल यांच्या आश्रमात सत्संगास जाणाऱ्या मिनी बसला राज्यस्थानमधील किसनगड ते हनुमानगड महामार्गावरील कालाभटजवळ शनिवारी अपघात होऊन १३ भाविक ठार झाले आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यातील सहा भाविकांचा समावेश आहे.
अपघातातील मयतामध्ये लातूर जिल्ह्यातील भगवान शंकर बेळंबे (४८), मयुरी भगवान बेळंबे (१८, दोघेही रा़ याकतपूर, ता़ औसा), अरुणा हणमंत तौर (४८, रा़ औसा), सुप्रिया बालाजी पवार (१६, रा़ किल्लारी), सुमित्रा गोवर्धन सांगवे (३५, रा. लामजना), सिद्धी गोवर्धन सांगवे (९, रा़ लामजना) या सहा जणांचा समावेश आहे़ तसेच बसचालक गोविंद (२८), श्यामजी गायकवाड (५५), रामचंद्र तुकाराम पवार (३०, सांगली), शिवप्रसाद दत्ता ठाकूर (२८, परभणी), शालूबाई वसंत शेळके (६०, सोलापूर), रुक्मिणी ज्ञानेश्वर शेळके (सोलापूर), बळीराम बालाजी पवार (२७) हे अपघातात ठार झाले आहेत.
लातूरसह अन्य ठिकाणचे भाविक गुरुवारी सकाळी हरियाणातील हिसार येथील बाबा रामपाल यांच्या आश्रमात होणाऱ्या सत्संगास खाजगी बस (एमएच २३, एएस ७१७६) ने निघाले होते़ या बसमध्ये एकूण २२ भाविक होते़ शनिवारी पहाटे राज्यस्थानातील किसनगड ते हनुमानगड राष्ट्रीय महामार्गावरील काला भाटाजवळ मिनी बसच्यासमोर वळू आला. त्याला चुकविण्याच्या प्रयत्नात बसचालकाचा ताबा सुटल्याने बस झाडावर जाऊन आढळली. त्यानंतर बस तीन ते चार वेळेस पलटी झाली़ यात १३ भाविक ठार झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या अपघातात सहा जण जखमी झाले असून आदर्श सांगवे (६, लामजना), लक्ष्मी पांडुरंग शेळके, प्रताप वसंत शेळके, गायत्री ज्ञानेश्वर शेळके (सर्व रा़ सोलापूर) यांचा समावेश असून एकाची ओळख अद्याप पटली नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.