बँकेत केवायसीसाठी निघालेल्या शेतकरी दांपत्याचा अपघाती मृत्यू
By हरी मोकाशे | Published: June 16, 2023 07:20 PM2023-06-16T19:20:07+5:302023-06-16T19:20:17+5:30
ट्रॅक्टर आणि दुचाकीची समोरासमाेर धडक बसली.
औराद शहाजानी (जि. लातूर) : शेतकरी सन्मान निधीकरिता बँकेत केवायसी करण्यासाठी दुचाकीवरुन जात असलेल्या शेतकरी दांपत्याचा अपघातात जागीच मृत्यू झाला. ही घटना निलंगा तालुक्यातील संगारेड्डीवाडी पाटीजवळ शुक्रवारी दुपारी १२.३० वा. च्या सुमारास घडली.
तानाजी ज्याेतीराम खामकर (५५) व सुकुमारबाई तानाजी खामकर (५०, रा. संगारेड्डीवाडी, ता. निलंगा) असे मयत पती- पत्नीचे नाव आहे. निलंगा तालुक्यातील संगारेड्डीवाडी येथील तानाजी ज्योतीराम खामकर व त्यांची पत्नी सुकुमारबाई खामकर हे दोघे शुक्रवारी दुपारी औराद शहाजानी येथील बँकेत शेतकरी सन्मान निधीकरिता केवायसी करण्यासाठी निघाले होते. ते संगारेड्डीवाडी पाटीजवळ आले असता ट्रॅक्टर (एमएच २४, एएस ८९३७) आणि त्यांची दुचाकीची समोरासमाेर धडक बसली.
या अपघातात तानाजी खामकर व त्यांची पत्नी सुकुमारबाई खामकर हे जागीच ठार झाले. या अपघाताची माहिती मिळताच औराद शहाजानीचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, ट्रॅक्टरचालक पसार झाला. अधिक तपास पोहेकॉ. विष्णू गिते, पोकॉ. लतिफ साैदागर हे करीत आहेत.