शिर्डीहून परतताना पिता-पुत्राचा अपघाती मृत्यू; लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील घटना
By हरी मोकाशे | Published: April 11, 2024 07:32 PM2024-04-11T19:32:07+5:302024-04-11T19:34:07+5:30
मल्लिकार्जून मन्मथप्पा कनडे (६०) व राहुल मल्लिकार्जून कनडे (३६, रा. औसा हनुमान, लातूर) असे मयत पिता- पुत्राचे नाव आहे.
लातूर: पुतणीसाठी मुलगा व घर पाहून शिर्डीहून परतताना एका कारचा भीषण अपघातलातूर- अंबाजोगाई महामार्गावरील कोळगाव तांडा येथे गुरुवारी पहाटे झाला. त्यात पिता- पुत्र जागीच ठार झाले, तर चौघेजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर लातुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मल्लिकार्जून मन्मथप्पा कनडे (६०) व राहुल मल्लिकार्जून कनडे (३६, रा. औसा हनुमान, लातूर) असे मयत पिता- पुत्राचे नाव आहे. पोलिस व नातेवाईकांनी सांगितले, लातुरातील औसा हनुमान येथील कनडे परिवारातील काहीजण दोन वाहनांनी अहमदनगर येथे मुलीस मुलगा आणि त्याचे घर पाहण्यासाठी बुधवारी पहाटे गेले होते. तेथील पै- पाहुण्यांची भेट घेऊन बुधवारी सायंकाळी शिर्डीमार्गे गावाकडे निघाले होते. शिर्डीचे दर्शन घेऊन हे सर्वजण परतत होते. दरम्यान, ते लातूर- अंबाजोगाई महामार्गावरील कोळगाव तांडा येथे पाेहोचले असता अचानकपणे पाठीमागून येणाऱ्या एका ट्रक चालकाने त्यांच्या चारचाकीला ओव्हरटेक केली आणि पुढे गतिरोधक असल्याने ब्रेक लावला. तेव्हा कनडे यांच्या चारचाकी चालकानेही तात्काळ ब्रेक लावला. मात्र, भरधाव वेगातील वाहनाने ट्रकला पाठीमागून धडक दिली.
या भीषण अपघातात मल्लिकार्जून मन्मथप्पा कनडे व राहुल मल्लिकार्जून कनडे हे पिता- पुत्र जागीच ठार झाले. तर गणेश मन्मथप्पा कनडे, नेहा नागेश कनडे, ओंकार नागेश कनडे, वीरनाथ सोरटे हे चौघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर लातुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे समसापूरचे बीट अंमलदार बालाजी दप्पडवाड यांनी सांगितले.