देवणी येथील खून प्रकरणातील आराेपीस सहा दिवसांची काेठडी
By राजकुमार जोंधळे | Published: October 4, 2023 09:53 PM2023-10-04T21:53:11+5:302023-10-04T21:53:54+5:30
चार पथकांकडून खुनाचा छडा : कर्जबाजारी आराेपीने केला खून...
राजकुमार जाेंधळे, लातूर : जिल्ह्यातील देवणी येथील अशाेक लुल्ले यांच्या खुनातील फरार आरोपीला पाेलिस पथकाने अटक केली असून, त्याला न्यायालयात हजर केले असता ९ ऑक्टाेबरपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, देवणी पोलिस ठाण्याच्या पथकाने संयुक्तपणे केली आहे.
पाेलिसांनी सांगितले, देवणी येथील शिवपार्वती लॉजमध्ये २६ ते २७ सप्टेंबरच्या मध्यरात्री अज्ञात मारेकऱ्यांनी अशोक मन्मथप्पा लुल्ले (वय ६४, रा. देवणी) यांचा निर्घृणपणे खून केला. याबाबत देवणी पाेलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. या खुनाचा उलगडा करून, आरोपीचा शोध घेण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले. त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, निलंगा उपविभागीय पाेलिस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, देवणीचे पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली चार पथके विविध दिशेला तैनात करण्यात आली. खुनाच्या कारणांचा उलगडा, मारेकऱ्यांचा विविध मार्गाने शोध घेत तपास केला जात होता. गुन्ह्यातील आरोपी खंडापूर (ता. लातूर) येथे राहणारा सचिन नारायण पाटील हा असल्याचे समाेर आले. त्यानेच हा खून केल्याचे निष्पन्न झाले.
ही कामगिरी सहायक पोलिस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते, पोलिस अंमलदार गुणाले, आगलावे, उस्तुर्गे, कांबळे, बुजारे, डोईजोडे, स्थागुशाचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण राठोड, पाेलिस अंमलदार माधव बिल्लापट्टे, नवनाथ हासबे, राजेश कंचे, जमीर शेख, राजू मस्के, नकुल पाटील, सायबर सेलचे पोलिस निरीक्षक अशोक बेले, गणेश साठे, शैलेश सुडे यांच्या पथकाने केली.
खबऱ्याच्या माहितीने फुटले आराेपीचे बिंग...
अशोक लुल्ले यांचा खून केल्यानंतर सचिन नारायण पाटील हा फरार झाला हाेता. ताे सतत वास्तव्याचे ठिकाण बदलत होता. त्याच्या मागावर पोलिस पथके हाेती. या पथकाकडून पुणे, पनवेल, मुंबई, दौंड, कुर्डूवाडी येथे शोध घेण्यात आला. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून फरार सचिन पाटील हा नांदेडात लपल्याचे पाेलिसांना समजले. त्याला पाेलिसांनी नांदेडातून पकडले. अधिक विचारपूस केली असता आरोपी हा कर्ज कर्जबाजारी झाल्याने अशोक लुल्ले यांना मारहाण करून खून केल्याची कबुली दिली.