तरुणाच्या खूनप्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा; उदगीर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
By राजकुमार जोंधळे | Published: January 14, 2024 06:50 PM2024-01-14T18:50:31+5:302024-01-14T18:50:43+5:30
उदगीर शहरातील महात्मा बसवेश्वर चाैकात अमित ऊर्फ साेन्या प्रकाश नाटकरे याने क्षुल्लक कारणावरून मारहाण केली.
लातूर: उदगीर येथील एका तरुणाच्या खून प्रकरणात दाेषी आराेपीला उदगीर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी.डी. सुभेदार यांनी जन्मठेप आणि पाच हजारांची शिक्षा ठाेठावली आहे. उदगीर शहरातील महात्मा बसवेश्वर चाैकात अमित ऊर्फ साेन्या प्रकाश नाटकरे याने क्षुल्लक कारणावरून मारहाण केली. यावेळी धारदार शस्त्राने चाकूने वार करून जगदीश किवंडे या तरुणाचा खून केला. ही घटना २९ जुलै २०२१ राेजी घडली हाेती. याबाबत मयताची आई सुनीता विजय किवंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून उदगीर शहर पाेलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पाेलिस उपनिरीक्षक येडके यांनी गुन्ह्याचा तपास करून, उदगीर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल केले. हा खटला न्यायाधीश पी.डी. सुभेदार यांच्या न्यायालयात चालला. यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकूण १३ साक्षीदारांची साक्ष न्यायालयात नाेंदविण्यात आली.
सरकार पक्षाच्या वतीने दाखल केलेली साक्ष, पुरावे, कागदपत्रे त्याचबराेबर सहायक सरकारी वकील शिवकुमार गिरवलकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश पी.डी. सुभेदार यांनी आराेपीला दाेषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा आणि पाच हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षाही ठाेठावली. या खटल्यात पाेलिस हेड काॅन्स्टेबल सिकंदर शेख यांनी काेर्ट पैरवी केली.