पोलिस ठाण्यांच्या रेकॉर्डवरील 1, 831 गुन्हेगारांवर कारवाई ! सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांची नजर
By राजकुमार जोंधळे | Published: November 2, 2024 10:45 PM2024-11-02T22:45:15+5:302024-11-02T22:45:51+5:30
निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलिसांनी अनेक फरार गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहोत.
लातूर : महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने पोलिसांनी लातूरसह जिल्ह्यातील विविध 23 पोलिस ठाण्यांच्या रेकॉर्डवर असलेल्या सराईत आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या 1 हजार 831 जणाविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलिसांनी अनेक फरार गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहोत. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या, ज्यांच्या वर्तनातून शांतता भंग होण्याचा धोका आहे. शिवाय, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, अशा व्यक्तीविरोधात विविध कायदा कलमान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, आतापर्यंत तब्बल 1 हजार 831 जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 126 प्रमाणे 1 हजार 430, कलम 128 प्रमाणे 2, कलम 129 प्रमाणे 134 व्यक्तीविरोधात कारवाईचा फास आवळण्यात आला.
दोन गुन्हेगारी टोळ्या लातूर जिल्ह्यातून हद्दपार...
महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951, कलम 55 प्रमाणे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या 2 टोळीला हद्दपार करण्यात आल्या असून, कलम 56 प्रमाणे 20 तर, कलम 57 प्रमाणे 10 कारवाया करण्यात आल्या आहेत.
अवैध दारु, हातभट्टी प्रकरणी 233 जणाविरोधात गुन्हे दाखल...
देशी-विदेशी दारू, हातभट्टीची अवैध विक्री, निर्मिती, साठवणूक करणाऱ्या आणि वारंवार गुन्हे दाखल करूनही वर्तनात सुधारणा न झालेल्या व महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे सतत उल्लंघन करणाऱ्या 233 व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. विविध गुन्ह्यांतर्गत पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.