लातुरात वीजचाेरी करणाऱ्या १०७ जणांवर कारवाईचा बडगा !
By राजकुमार जोंधळे | Published: December 13, 2022 07:04 PM2022-12-13T19:04:50+5:302022-12-13T19:05:11+5:30
लातूर येथील महावितरणच्या भरारी पथकाची माेहीम...
लातूर : अधिकृत वीज ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा होण्यासाठी महावितरणने अवैध वीज वापरणाऱ्यांविराेधात धडक मोहीम हाती घेतली आहे. डिसेंबर २०२२ मध्ये लातूर जिल्ह्यात भरारी पथकाद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत १०७ जणांकडून अनधिकृत वीज वापर होत असल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक सतीश कापडणी यांनी दिली.
गत आठवड्यात महावितरणच्या भरारी पथकाने लातूर जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर आणि लातूर शहर उपविभागातील संशयास्पद काही वीज ग्राहकांची स्थळ तपासणी केली. त्यातील १०७ प्रकरणांत अवैध वीजवापर होत असल्याचे पथकाला आढळून आले आहे. त्यानुसार विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये वीजचोरी प्रकरणी ८३ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. कलम १२६ अन्वये ११ ग्राहकांकडे वीज वापरात अनियमितता आढळून आली आहेत. तर इतर १३ प्रकरणात कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. यातील दोषी आढळलेल्या ग्राहकांना निश्चित केलेली देयके भरण्यासाठी महावितरण कंपनीच्या नियमानुसार वीजबिल भरण्यास मुदत देण्यात आली आहे. त्यांनी विहित कालावधीत रक्कम भरली नाही, तर त्यांच्याविराेधात विद्युत आधिनियम २००३ नुसार कारवाई करण्यात येणार आहे. या वीजचोरीत मोठ्या प्रमाणात औद्योगिक आणि व्यवसायिक ग्राहकांचा समावेश आहे.
विद्युत अधिनियम २००३ च्या कलम १३५ आणि १३८ नुसार वीजचोरी हा दंडनीय अपराध असून, यात वीजचोरी करणाऱ्या आरोपीला सश्रम कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. आगामी काळात वीज चोरांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात वीजचोरी शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.