लातूरात रेकाॅर्डवरील ३ हजार ६६३ सराईत गुन्हेगारांवर कारवाई !
By राजकुमार जोंधळे | Published: April 29, 2024 03:36 PM2024-04-29T15:36:17+5:302024-04-29T15:36:39+5:30
लातूर पोलिसांकडून महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ५५ प्रमाणे हद्दपारीचे प्रस्ताव तयार केले असून, अनेकांवर हद्दपारीची कारवाई केली आहे.
लातूर : लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा पाेलिस दल ‘अलर्ट माेड’वर असून, साेशल मीडियात आक्षेपार्ह मजकूर व्हायरल करणाऱ्यांवर आता सायबर माॅनटरिंग, साेशल मीडिया माॅनिटरिंग सेल आणि गाेपनीय माहिती विभागाकडून करडी नजर ठेवण्यात येत आहे. गत महिनाभरात साेशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर व्हायरल करणाऱ्याविराेधात विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अफवा पसरवली; गुन्हे दाखल, अटक...
सायबर क्राईम सेल, सायबर माॅनिटरिंग, साेशल मीडिया माॅनिटरिंग सेल, गाेपनीय माहिती विभागाच्या पथकामार्फत साेशल मीडिया आक्षेपार्ह मजकूर, पाेस्ट व्हायरल करणाऱ्यांवर यंत्रणेची नजर आहे. समाजामध्ये अशांतता पसरविणाऱ्याविराेधात कारवाई केली जात आहे. तर अफवा परसरविणाऱ्यांवर, आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करून नागरिकांत दहशत पसरविणाऱ्या आठ जणांविराेधात विवेकानंद चाैक, गांधी चाैक ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
२९,१५,६३१ रुपयांचा गुटखा जप्त...
चाेरट्या मार्गाने गुटख्याची वाहतूक, विक्री आणि साठा करणाऱ्याविराेधात लातूर जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांत स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. यातून २९ लाख १५,६३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
निवडणूक काळात ५५ आराेपींचे प्रस्ताव...
विविध ठाण्यांच्या रेकाॅर्डवरील अट्टल, सराईत गुन्हेगार, गंभीर गुन्हे करणाऱ्यांविराेधात लातूर पोलिसांकडून महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ५५ प्रमाणे हद्दपारीचे प्रस्ताव तयार केले असून, अनेकांवर हद्दपारीची कारवाई केली आहे.
विविध कलमांन्वये पाेलिसांचा दणका...
कलम १०७ - २,९२६ जणांवर कारवाई
कलम १०९ - २० जणांवर कारवाई
कलम ११० - २४० जणांवर कारवाई
कलम ९३ - ४०७ जणांवर कारवाई
एकूण - ३६६३ जणांविराेधात कारवाई