लातुरात ७८ मद्यपींवर कारवाई; १ हजार ६७७ वाहनांची तपासणी
By राजकुमार जोंधळे | Published: January 1, 2024 11:09 PM2024-01-01T23:09:40+5:302024-01-01T23:12:14+5:30
मावळत्या वर्षाला निरोप अन् नववर्षाचे स्वागत रविवारी मध्यरात्री जल्लोषात करण्यात आले.
राजकुमार जाेंधळे
लातूर : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर लातूरसह जिल्ह्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला हाेता. दरम्यान, कोंबिंग ऑपरेशन करून ४४ फरार आराेपींना अटक करण्यात आली. जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करून तब्बल ११२४ वाहनचालकांवर खटले दाखल करण्यात आले आहे. रविवारी रात्रभर ५२ अधिकारी, ५०० पोलिस कर्मचारी, २०० होमगार्ड बंदाेबस्तावर हाेते.
मावळत्या वर्षाला निरोप अन् नववर्षाचे स्वागत रविवारी मध्यरात्री जल्लोषात करण्यात आले. थर्टी फर्स्टनिमित्त मद्यसेवनासह नियम मोडणाऱ्यांविराेधात पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले असून, रात्री उशिरा सुरू झालेली तपासणी माेहीम पहाटेपर्यंत होती. अतिमद्यसेवन केलेल्या वाहनचालकांना ड्रंक ॲण्ड ड्राइव्हचे खटले दाखल करण्यात आले. कोंबिंग ऑपरेशनदरम्यान, जिल्ह्यात ४० ठिकाणी नाकाबंदी केली. रविवारी पहाटेपर्यंत १ हजार ६५८ वाहनांची तपासणी करण्यात आली. ७८ मद्यधुंदावस्थेतील वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. ११२४ वाहन चालकांवर खटले दाखल केले. त्याचबराेबर ओव्हर स्पीडचे ५० गुन्हे दाखल करण्यात आले.
जिल्ह्यातील ७२ हाॅटेल्स, लाॅजची झाडाझडती...
लातूर जिल्ह्यातील ७२ हॉटेल, लॉजची झाडाझडती घेतली. विविध गुन्ह्यामध्ये फरार झालेल्या ४४ आरोपींना अटक केली. दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या तिघांवर कारवाई करण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी रात्री विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी पॉइंटवर भेट देत पाहणी केली.