अवैध वाळू विक्रीप्रकरणी वाहनावर धडक कारवाई
By राजकुमार जोंधळे | Published: June 8, 2023 05:38 AM2023-06-08T05:38:36+5:302023-06-08T05:39:07+5:30
कोकळगाव, औरादच्या तीन ट्रॅक्टरमालकांवर गुन्हा
राजकुमार जाेंधळे, निलंगा / औराद शहाजानी (जि. लातूर) : कोकळगाव आणि औराद शाहजानी परिसरात अवैध वाळू विक्री करणाऱ्या तीन ट्रॅक्टरमालकांवर उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यानी दंडात्मक कारवाई केली असून, त्यांच्याविराेधात निलंगा पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.
निलंगा तालुक्यातील तेरणा नदी पात्रातील विनापरवाना अवैध वाळू उपसा करणाऱ्या औराद येथील जावेद सरफोद्दिन मुल्ला (रा. वांजरखेडा), भागवत लक्ष्मण जाधव ( रा. मानेजवळगा) यांचे ट्रॅक्टरमधून (एमएच २० सीआर २९३५) शासन मालकीच्या वाळूचा उपसा करून अवैधरीत्या वाहतूक करत हाेते. या वाळूची विक्री करत असल्याचे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना आढळून आले. दरम्यान, ६ जून रोजी औराद शाहजानी येथील कर्नाटक सीमाभागातील टोल नाक्याजवळ ते ट्रॅक्टर पकडून त्यातील तीन लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याचबराेबर वाळू विक्रीप्रकरणी औराद शाहजानी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर शासकीय नियमानुसार १ लाख २० हजार रुपयांचा दंड केला आहे.
काेकळगावात दहा लाखांचा मुद्देमाल जप्त..
कोकळगाव येथील दोन ट्रॅक्टरमालक, चालकांनी तेरणा नदीपात्रातील अवैध वाळूचा उपसा करून ट्रॅक्टरमधून वाळूची विक्री करण्यासाठी घेऊन जात हाेते. कोकळगाव शाळेच्या पाठीमागील शेतात रात्री १ वाजता उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्या पथकाने छापा मारला. घटनास्थळावरून ट्रॅक्टरमालक, चालक वाहन सोडून पळून गेले. याबाबत कासार शिरसी ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळावरून ७ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिवाय, विनानंबर दोन्ही ट्रॅक्टरच्या मालक, चालकावर २ लाख ४० हजारांचा दंड ठोठावला आहे. ही कारवाई तलाठी मुकेश सागावे, मधुकर सूर्यवंशी, गंगाराम सूर्यवंशी, पोलिस कर्मचारी भोसले यांच्या पथकाने केली.