अकृषी कराच्या वसुलीसाठीची कारवाई बेकायदेशीर; तहसीलदारांना लातूर मनपाच्या उपायुक्तांचे पत्र
By हणमंत गायकवाड | Updated: March 15, 2024 16:40 IST2024-03-15T16:38:47+5:302024-03-15T16:40:06+5:30
गांधी चौक व्यापारी संकुलातील महापालिकेच्या मालकीच्या १७ ते १८ दुकानांना तहसीलच्या पथकाने टाळे ठोकले होते.

अकृषी कराच्या वसुलीसाठीची कारवाई बेकायदेशीर; तहसीलदारांना लातूर मनपाच्या उपायुक्तांचे पत्र
लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील मालमत्ता कर मागणी देयकांमध्ये अकृषी कराची मागणी समाविष्ट केलेली आहे. त्यानुसार यापूर्वी महापालिकेने अकृषी कराचा भरणा केलेला आहे. त्यामुळे आपण केलेली कारवाई नियमबाह्य आहे. महापालिकेच्या मालमत्तांचे फेरसर्वेक्षण करून अकृषी कराची आकारणी करण्यात यावी, असे पत्र लातूर महानगरपालिकेच्या उपायुक्तांनी लातूर तहसीलदारांना पाठवले आहे.
गांधी चौक व्यापारी संकुलातील महापालिकेच्या मालकीच्या १७ ते १८ दुकानांना तहसीलच्या पथकाने टाळे ठोकले होते. तहसीलने केलेली ही कारवाई नियमबाह्य असल्याचे महानगरपालिकेच्या उपायुक्तांनी तहसीलदारांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. रहिवासी वापराचा अकृषी कर कमी करून देण्यात यावा. यापूर्वी कर भरणा केलेला आहे. अकृषी कर कमी करून दिल्यानंतर ४२ लाख ३७ हजार ६२१ रुपये जास्तीचा रक्कम भरणा आपल्याकडे केलेला आहे. त्यामुळे लातूर शहर महापालिकेच्या मालमत्तांचे फेरसर्वेक्षण करून अकृषी कराची आकारणी करण्यात यावी. गांधी चौक व्यापारी संकुलामधील गाळ्यांचे केलेले नियमबाह्य सील यामुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे सील काढून देण्यात यावे, असेही तहसीलदारांना दिलेल्या पत्रात महानगरपालिकेने म्हटले आहे.