लातुरातील गुन्हेगारावर ‘एमपीडीए’नुसार कारवाई; नाशिक कारागृहात रवानगी
By राजकुमार जोंधळे | Published: May 3, 2024 11:57 PM2024-05-03T23:57:48+5:302024-05-03T23:58:41+5:30
लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी पाेलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा (एमपीडीए) कायद्यानुसार लातुरातील सुभेदार रामजीनगर परिसरात राहणारा स्वप्निल उर्फ पन्या गौतम कांबळे (२४) याच्याविरुद्ध कारवाई केली आहे.
लातूर : सार्वजनिक शांततेला बाधा आणणाऱ्या एका सराईत गुन्हेगारावर पाेलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा कायद्यानुसार (एमपीडीए अॅक्ट) कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याची नाशिकच्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी शुक्रवारी दिली.
लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी पाेलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा (एमपीडीए) कायद्यानुसार लातुरातील सुभेदार रामजीनगर परिसरात राहणारा स्वप्निल उर्फ पन्या गौतम कांबळे (२४) याच्याविरुद्ध कारवाई केली आहे. एमपीडीए कायद्यानुसार कारवाईचा लातुरातील कायदा व सुव्यवस्था अडचणीत आणणाऱ्या गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी, गुन्हेगारी रोखण्यासाठी लातूर पोलिसांकडून कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. स्वप्निल उर्फ पन्या गौतम कांबळे याला 'एमपीडीए' कायद्यानुसार एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्याची नाशिक येथील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. जिल्हा पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या कार्यकाळातील एमपीडीए कायद्यानुसार करण्यात आलेली ही नववी कारवाई आहे.
स्थानबद्धतेच्या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी... -
ही कारवाई जिल्हा पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, डीवायएसनी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, एमआयडीसी ठाण्याचे पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे, पाेउपनि. संदीप कराड, विष्णू वायगावकर, गणेश मालवदे, भीमराव बिल्लाळे, अर्जुन राजपूत, युवराज गिरी, सिद्धेश्वर मदने, संतोष खांडेकर यांच्या पथकाने केली. त्यांनी स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे याच्याकडे मंजुरीसाठी पाठविला होता. दरम्यान, या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे.
गाैतम कांबळेविराेधात १३ गंभीर गुन्ह्यांची नाेंद... -
लातुरातील गुन्हेगार स्वप्निल उर्फ पन्या गौतम कांबळे याच्याविराेधात लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात एकूण १३ गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नाेंद आहे. यामध्ये शस्त्रासह शरीराविरुद्ध, जबरीने मालमत्ता चोरी करणे, मालमत्ता चोरी, भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्ह्यांचा समावेश आहे. - साेमय मुंडे, पाेलिस अधीक्षक