रेणापुरात १४९७ कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:21 AM2021-04-23T04:21:01+5:302021-04-23T04:21:01+5:30
रेणापूर : शहराबरोबरच तालुक्यातील पानगाव, पोहरेगावात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना धास्ती बसली आहे. तालुक्यात आतापर्यंत एकूण २ ...
रेणापूर : शहराबरोबरच तालुक्यातील पानगाव, पोहरेगावात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना धास्ती बसली आहे. तालुक्यात आतापर्यंत एकूण २ हजार ६०९ बाधितांची नोंद झाली असून त्यातील १ हजार ६८ जण उपचारानंतर ठणठणीत झाले आहेत. त्यामुळे सध्या तालुक्यात १ हजार ४९७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
रेणापूर शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक झाला आहे. तो रोखण्यासाठी आरोग्य विभागाबरोबरच महसूल, पंचायत समिती, पोलीस प्रशासनाकडून जनजागृती करण्याबरोबरच प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे. मात्र, रस्त्यावर विनाकारण फिरणा-यांची संख्या कमी न झाल्याने संसर्ग वाढतच राहिला. दरम्यान, राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लागू केल्याने आणि त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. नाहक फिरणा-यांवर दंडात्मक कार्यवाही केली जात आहे.
तालुक्यात एकूण ७१ गावे असून त्यापैकी ५७ गावांपर्यंत संसर्ग पोहोचला आहे. हा संसर्ग होऊ नये म्हणून गाव पातळीपर्यंत पोहोचू नये म्हणून दक्षता घेतली जात आहे. तसेच कोविडचा संसर्ग झालेल्यांच्या हायरिस्कमधील व्यक्तींची चाचणी केली जात आहे. तसेच गावात निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. गावाबाहेरील व्यक्तींची चाचणी केली जात आहे. कडक नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. घरोघरी जाऊन लसीकरणविषयी जनजागृती केली जात आहे. नियमांचे पालन करण्यासाठी नागरिकांना सातत्याने आवाहन करण्यात येत आहे.
घरोघरी जाऊन संशयितांचा शोध...
आशा स्वंयसेविकांमार्फत कोरोनाची लक्षणे असणा-या व्यक्तींचा घरोघरी जाऊन शोध घेतला जात आहे. त्यांचे शरीरातील ऑक्सिजन तपासण्यात येत आहे. गावोगावी आराेग्य कर्मचारी रुग्णांची तपासणी करीत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करुन बाधितांना कोविड केअर सेंटरला दाखल केले जात आहे. ग्रामपंचायत, नगरपंचायतीकडून जनजागृती करण्यात येत आहे.
- डॉ. नारायण देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी.
चाचण्यांवर भर...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व विभागात समन्वय साधून बाधितांचा शोध घेतला जात आहे. लसीकरण व चाचण्या मोठ्या प्रमाणात केल्या जात आहे. प्रत्येक ग्रामपंचायत, तालुका प्रशासन, आरोग्य विभाग, पंचायत समितीमार्फत जनजागृती केली जात आहे.
- राहुल पाटील, तहसीलदार.
१४ गावांनी कोरोनाला रोखले...
तालुक्यात एकूण ७१ गावे असून त्यापैकी ५७ गावांपर्यंत संसर्ग पोहोचला आहे. १४ गावांनी कोरोनाला वेशीवर रोखले आहे. तालुक्यात एकूण बाधित २ हजार ६०९ झाले असून उपचारानंतर १ हजार ६८ जण बरे झाले आहेत. सध्या १ हजार ४९७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत ४४ जणांचा बळी गेला आहे. होम आयसोलेनमध्ये १०२६, बावची येथील कोविड केअर सेंटरमध्ये ८५, ग्रामीण रुग्णालयात २५ रुग्ण उपचार घेत आहेत.
रेणापूर १८०, पानगाव १५६, पोहरेगाव १५०, मुसळेवाडी ४०, रामवाडी २५.