शेतकऱ्यांच्या चिंतेत भर, बाजारात सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर !
By संदीप शिंदे | Published: October 10, 2023 05:42 PM2023-10-10T17:42:13+5:302023-10-10T17:50:34+5:30
आर्थिक घडी विस्कटणार :खाद्यतेल आयात केल्यामुळे दरात घसरण...
उदगीर : येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात एक महिन्यापासून घसरण सुरुच असून, मंगळवारी मार्केट यार्डात शासनाने चालू हंगामासाठी जाहीर केलेला ४ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटलचा हमीभावही सोयाबीनला मिळाला नाही. केवळ ४ हजार ५५० रुपयांचा दर मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, चिंतेत भर पडली आहे.
यावर्षी सोयाबीनची पेरणी केल्यानंतर कमी पावसाच्या तडाख्यातून शेतकऱ्यांनी थोड्या प्रमाणात का होईना पीक वाचविले. सध्या तालुक्यात कडक ऊन पडल्यामुळे सोयाबीनचे पीक वाळून चालले आहे. त्यामुळे सोयाबीनच्या कापणी कामाला वेग आला आहे. मागील वर्षीपेक्षा कापणीच्या मजुरी दरात वाढ झाली आहे. प्रति बॅग चार हजार रुपये मजुरी मोजावी लागत असल्याने अडचणी वाढल्या आहेत. त्यातच बाजारात सोयाबीनला दर नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
कमी पावसामुळे सोयाबीनची वाढ खुंटली असून, अनेक ठिकाणी पीक वाया गेले आहे. त्यातच ऑगस्ट महिन्यात पडलेल्या पावसाच्या मोठ्या खंडामुळे एकरी उत्पादन कमालीचे घटले आहे. ज्या शेतामध्ये मागील वर्षी आठ ते दहा पोते सोयाबीन उत्पादन होते, त्याच शेतात यंदा तीन पोते उतारा येत आहे. शेंगा भरण्याच्या अवस्थेत पिवळा तांबोरा रोगाने पिकाचे नुकसान केले. अशा एक ना अनेक संकटातून वाचलेल्या सोयाबीन पिकाची काढणी, मजुरीचा वाढलेला दर, मळणी यंत्राचा खर्चाची गोळा बेरीज केल्यास शेतकऱ्यांच्या हाती नुकसानच शिल्लक आहे. मागील वर्षापासून सोयाबीनच्या दरात दिवसेंदिवस घट होत आहे. बाजारात नवीन सोयाबीन येण्याच्या अगोदर जुन्या सोयाबीनचा दर ५ हजार २०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत स्थिरावला होता. परंतु मागील आठवड्यापासून उदगीरच्या बाजारात नवीन सोयाबीनची आवक बऱ्यापैकी होत आहे. बाजारात नवीन सोयाबीनची आवक जरी चांगली होत असली तरी दर मात्र घसरत आहेत.
मंगळवारी बाजारात ४५५० रुपयांचा दर...
चालू हंगामासाठी शासनाने सोयाबीनचा दर ४६०० रुपये प्रतिक्विंटल जाहीर केला आहे. परंतु मंगळवारी मार्केट यार्डमध्ये ४ हजार ५५० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाली. त्यात पुन्हा ओलावा पाहून दर ठरत असल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना सोयाबीनच्या उत्पादनातून काहीही शिल्लक राहणार नसल्याचे संकेत दिसत आहेत. सोयाबीन कारखानदाराकडून मागणी जेमतेम असल्यामुळे बाजारात दर घसरण्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सोयाबीन खरेदी करण्यासाठी हमीभाव केंद्र शासनाने सुरु करण्याची मागणी होत आहे.
खाद्यतेल आयात केल्यामुळे दरात घसरण...
केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात बाहेर देशातून खाद्यतेल आयात करण्यासाठी आयात शुल्कमुक्त धोरण अवलंबले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाची आवक झालेली आहे. सोबत सोयाबीन पेंडीला ग्राहक नाही. तसेच विदर्भातील सर्वच बाजारपेठेत, मध्य प्रदेशात नवीन सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. त्याचा परिणाम आपल्या बाजारपेठेवर दिसून येत असल्याने दर घसरले आहेत, असे सोयाबीन खरेदीदार व्यापारी अमोल राठी यांनी सांगितले.