कोरोनाला हरवण्यासाठी एरोबिक्सची जोड; कोविड केंद्रावरील आशादायी दृश्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 03:00 PM2020-07-27T15:00:52+5:302020-07-27T15:01:51+5:30
विलगिकरण कक्षातील सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णासह कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर त्यांच्या क्षमेतनुसार एरोबिक्स व प्राणायामाचे धडे
- महेश पाळणे
लातूर : कोरोना झाला म्हणजे सगळेच गंभीर होतात, प्रकृती बिघडते असे नाही. सौम्य लक्षणे असणारे आणि लवकर बरे होऊन घरी जाणारे सर्वाधिक आहेत. असाच सुखद अनुभव बारा नंबर पाटीवरील कोविड केअर सेंटरवरील रुग्णांना येत आहे. कोरोनाला हरवण्यासाठी दररोज सायंकाळी प्राणायामा बरोबर एरोबिक्स सुरू आहे. त्यासाठी प्रशिक्षक दीपक लोखंडे, विशाल सुरवसे यांनी धाडसी पुढाकार घेतला आहे.
लातूर शहरातील १२ नंबर पाटी येथे असलेल्या कोविड सेंटरवर एरोबिक्स प्रशिक्षक दीपक लोखंडे व त्यांचे सहायक विशाल सुरवसे हे रविवारपासून विलगिकरण कक्षातील सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णासह कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर त्यांच्या क्षमेतनुसार एरोबिक्स व प्राणायामाचे धडे सायंकाळच्या सत्रात देत आहेत. सायंकाळी ५ ते ६.३० वाजेच्या दरम्यान दीड तास संगीताच्या तालावर इझी एरोबिक्स व प्राणायामचे धडे रुग्णांना देत आहेत. रुग्णांचे मानसिक स्वास्थ वाढविणे, आनंद देणे व नैराश्य घालविण्यासाठी या थेरीपीचा आधार दिला जात आहे. यामुळे रुग्णांमधील भीतीदायक वातावरण कमी होण्यास मदत होत आहे. श्वसनाचा व्यायाम यातून उत्तमप्रकारे होत असून, इंडोरफीन हार्मोन या माध्यमातून जागृत होत आहेत. संगीताच्या तालावर व्यायाम असल्याने रुग्णांचेही मनोबल वाढत आहे. त्याचा सकारात्मक परिणाम रुग्णांवर दिसत आहे. लहान मुलांसह, तरुण, वयस्कर असे जवळपास दीडशे रुग्ण यात सहभागी होत असून, या थेरपीमुळे रुग्णांना नवी ऊर्जा मिळत आहे. एकंदरीत या व्यायामामुळे फुफ्फुसाची गतिमानता वाढविण्यास मदत होत असून, हृदयाची कार्यक्षमता, श्वसनासंबंधी ऊर्जा व आनंदी वातावरण निर्माण होत आहे.
जिल्ह्यातील इतर कोविड सेंटरवर उपक्रम राबविण्याचा मानस...
सुरुवातीच्या काळात व्यायामासाठी रुग्ण पुढे येत नव्हते. मात्र, प्रबोधन केल्यानंतर त्यांची संख्या हळूहळू वाढू लागली. जिल्हा प्रशासनानेही यासाठी पुढाकार घेऊन पाठबळ दिले. भविष्यात उर्वरित कोविड सेंटरवरही प्रशासनाच्या माध्यमातून एरोबिक्स आणि प्राणायाम सेंटर चालू करण्याचा मानस आहे. जेणेकरून रुग्णांमध्ये कोरोनाविरुद्ध लढण्याची सकारात्मक उर्जा निर्माण होईल, असे प्रशिक्षक दीपक लोखंडे यांनी सांगितले.
उपचार घेत असलेल्या रुग्णांकडून उपक्रमाचे कौतुक...
जिल्हा प्रशासनाच्या मदतीने १२ नंबर पाटी येथील कोविड सेंटरमध्ये एरोबिक्स, प्राणायमचे धडे दिले जात आहेत. सौम्य लक्षणे व लक्षणे नसलेल्या रुग्णासाठी सदरील उपक्रम फायदेशीर ठरत आहे. तर लक्षणे असलेल्या रुग्णांकडून हलकासा व्यायाम करून घेतला जात आहे. कोरोनाशी लढण्यासाठी सकारात्मक ऊर्जा मिळत असल्याने या उपक्रमाचे कोविड सेन्टरमधील रुग्णांकडून कौतुक होत आहे.