शासकीय सेवेत समायोजन करावे; एनएचएमच्या कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
By हरी मोकाशे | Published: November 1, 2023 06:13 PM2023-11-01T18:13:01+5:302023-11-01T18:13:30+5:30
जिल्हा परिषदेसमाेर ठिय्या : लक्ष वेधण्यासाठी जोरदार घोषणा
लातूर : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गतच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेत समायोजन करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी काम बंद करीत जिल्हा परिषदेसमोर बुधवारपासून ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जोरदार घोषणा देण्यात आल्या.
गेल्या काही वर्षांपासून शासनाच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानअंतर्गत ग्रामीण रुग्णालयापासून ते आरोग्य उपकेंद्रापर्यंतच्या माध्यमातून आरोग्य सुविधा पुरविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हे कंत्राटी पध्दतीने कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांचे शासकीय सेवेत समायोजन करुन घेण्यात यावे, या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. दरम्यान, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गतचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, औषध निर्माण अधिकारी व एएनएम यांचे बुधवारी चौथ्या दिवशीही काम बंद आंदोलन सुुरु होते. तसेच महाराष्ट्र राज्य समुदाय अरोग्य अधिकारी संघटनेच्या वतीनेही तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरु होते.
नऊ आरोग्य संघटनांकडून काम बंद...
राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समितीच्या जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर बुधवारपासून बेमुदत आंदोलन सुरु करण्यात आले आहे. त्यात महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटना, कंत्राटी आयुष वैद्यकीय अधिकारी संघटना, आर.बी.एस.के. कॉन्ट्रॅच्युअल मेडिकल ऑफिसर युनियन, राष्ट्रीय आरोेग्य अभियान अधिकारी कर्मचारी महासंघ, आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन, महाराष्ट्र राज्य सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कर्मचारी संघटना, कंत्राटी औषध निर्माता कृती समिती, महाराष्ट्र राज्य अस्थाई कुष्ठरोग तंत्रज्ञ असोसिएशन, कास्ट्राईब असंसर्गजन्य नियंत्रण कार्यक्रम कर्मचारी कल्याण संघटनेचा समावेश आहे.