सर्व अंगणवाड्या सुरु करण्यासाठी प्रशासनाचा दबाव, कर्मचाऱ्यांचे झेडपीसमोर धरणे आंदोलन

By हरी मोकाशे | Published: January 8, 2024 06:02 PM2024-01-08T18:02:09+5:302024-01-08T18:02:29+5:30

कर्मचाऱ्यांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न...

Administration's pressure to start all Anganwadis, employees protest in front of Latur ZP | सर्व अंगणवाड्या सुरु करण्यासाठी प्रशासनाचा दबाव, कर्मचाऱ्यांचे झेडपीसमोर धरणे आंदोलन

सर्व अंगणवाड्या सुरु करण्यासाठी प्रशासनाचा दबाव, कर्मचाऱ्यांचे झेडपीसमोर धरणे आंदोलन

लातूर : अंगणवाडी सेविका, मदतनीसांनी आपले प्रश्न सोडविण्यासाठी बेमुदत संप पुकारला आहे. दरम्यान, प्रशासन दबावतंत्राचा वापर करुन अंगणवाड्या सुरु करण्यास भाग पाडत आहे, असा आरोप करीत सेविका व मदतनीसांनी सोमवारी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करीत धरणे आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणा देत सरकारच्या धोरणावर संताप व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात राज्य संघटक दत्ता देशमुख, बापू शिंदे यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस सहभागी झाले होते. अंगणवाडी सेविका, मदतनीसांना शासकीय कर्मचारी घोषित करुन त्याअनुषंगाने वेतनश्रेणी, ग्रॅच्युईटी, भविष्यनिर्वाह निधीचा लाभ द्यावा. सेविकांना मासिक २६ हजार तर मदतनिसांना मासिक २० हजार मानधन देण्यात यावे. आहाराचा दर सर्वसाधारण बालकांसाठी १६ तर अतिकुपोषित बालकांसाठी २४ रुपये असा करावा. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलेल्या नोटिसा मागे घेऊन त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही करु नये अशा मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेस देण्यात आले.

कर्मचाऱ्यांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न...
अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी ४ डिसेंबरपासून राज्यव्यापी संप पुकारला आहे. सोमवारी संपाचा ३६ वा दिवस आहे. त्यामुळे लाभार्थी पोषण आहार, शालेय पूर्व शिक्षण व इतर लाभापासून वंचित राहत आहेत. शासनाने तोडगा काढला असता तर संप इतके दिवस लांबला नसता. दरम्यान, प्रशासनाकडून दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे. मात्र, शासन व प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक चर्चा करुन प्रश्न सोडवावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

Web Title: Administration's pressure to start all Anganwadis, employees protest in front of Latur ZP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.