प्रशासकीय यंत्रणा सज्ज, मतदान केंद्रांवर सर्व सुविधा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

By आशपाक पठाण | Published: May 5, 2024 08:13 PM2024-05-05T20:13:19+5:302024-05-05T20:13:26+5:30

जनजागृतीमुळे मतदानाचा टक्का वाढेल

Administrative system ready, all facilities at polling stations-District Magistrate Varsha Thakur-Ghuge | प्रशासकीय यंत्रणा सज्ज, मतदान केंद्रांवर सर्व सुविधा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

प्रशासकीय यंत्रणा सज्ज, मतदान केंद्रांवर सर्व सुविधा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

लातूर: लातूर लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदारसंघातील २ हजार ११५ मतदान केंद्रांवर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मतदारसंघात एकूण १६ हजार ७६५ अधिकारी, कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली.

लातूर लोकसभा मतदारसंघात १९ लाख ७७ हजार ४२ मतदार हक्क बजावणार आहे. ७ मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत एकूण २ हजार ११५ केंद्रांवर मतदान होणार आहे. याठिकाणी ८ हजार ५०० अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. शिवाय, त्यांना साहाय्य करण्यासाठी ८ हजार २६२ अधिकारी, कर्मचारी आहेत. यात बीएलओ, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, क्षेत्रीय अधिकारी यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे सुरक्षेसाठी पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यावेळी जिल्हा परिषदेचे सीईओ अनमोल सागर, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) भारत कदम यांची उपस्थिती होती.

७८९ मतदान केंद्रांवर मंडप...

मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांगाची गैरसोय होणार नाही, यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ७८९ मतदान केंद्रांवर सावलीसाठी पेंडॉलची टाकण्यात येत आहे. मतदान केंद्रावर उपलब्ध खोलीत मतदारांसाठी पंखा, बसण्यासाठी खुर्ची, दिव्यांगासाठी व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आरोग्यासाठी १६४८ जणांची नियुक्ती...
मतदारांच्या आरोग्याच्या काळजीसाठी प्रथमोपचार पेटीसह आरोग्य कर्मचारी मतदान केंद्रावर असणार आहेत. त्यांच्याकडे ओआरएस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांचे अधिनस्त असलेले वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी असे एकूण १ हजार ६४८ जण आरोग्य सेवेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत.

१६ मतदान केंद्रे संवेदनशील...

लोकसभा मतदारसंघात एकूण २ हजार ११५ मतदान केंद्रे आहेत, त्यातील १६ मतदान केंद्रे संवेदनशील असल्याने याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. यात वेबकास्टिंग, व्हिडीओग्राफी आणि सशस्त्र जवान नियुक्त करण्यात आले आहेत. एकूण १ हजार ६२ मतदान केंद्रावर वेबकास्टिंग केली जाणार असून या केंद्रावरील हालचालींवर जिल्हाधिकारी कार्यालयातून लक्ष ठेवले जाणार आहे.

प्रत्येकाने एक रोपटे लावावे...
पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने मतदान केल्यावर एक झाड लावावे, यासाठी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मतदारांना बी दिले जाणार आहे. मतदारांनी शाईप्रमाणे एक रोपटे लावावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.प्रशासकीय यंत्रणा सज्ज, मतदान केंद्रांवर सर्व सुविधा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर -घुगे : जनजागृतीमुळे मतदानाचा टक्का वाढेल

 

Web Title: Administrative system ready, all facilities at polling stations-District Magistrate Varsha Thakur-Ghuge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.