कौतुकास्पद! वसुंधरा प्रतिष्ठानचे सहा सदस्य करणार मरणोत्तर देहदान 

By हणमंत गायकवाड | Published: September 29, 2023 06:19 PM2023-09-29T18:19:43+5:302023-09-29T18:20:07+5:30

लातूर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कायदेशीर प्रक्रिया केली पूर्ण

Admirable! Six members of Vasundhara Foundation will do posthumous body donation | कौतुकास्पद! वसुंधरा प्रतिष्ठानचे सहा सदस्य करणार मरणोत्तर देहदान 

कौतुकास्पद! वसुंधरा प्रतिष्ठानचे सहा सदस्य करणार मरणोत्तर देहदान 

googlenewsNext

लातूर : वृक्ष लागवड आणि संवर्धन करण्यासाठी गेल्या एक दशकापासून कार्यरत असलेल्या वसुंधरा प्रतिष्ठानच्या सहा सदस्यांनी मरणोत्तर देहदान करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी या सदस्यांनी मरणोत्तर देहदानाची कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण केली आहे.

वसुंधरा प्रतिष्ठान सामाजिक संघटन असून गेल्या दहा वर्षांपासून या प्रतिष्ठानने लातूर शहरासह जिल्ह्यात वृक्ष लागवड आणि संवर्धनाचा यज्ञ सुरू केला आहे. वृक्ष लागवडीसाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. आता प्रतिष्ठानच्या सहा सदस्यांनी देहदान करण्याचा निर्णय घेऊन वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यासंबंधी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे ही प्रक्रिया पूर्ण करताना जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकूर यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. समीर जोशी यांची उपस्थिती होती. देहदान करणाऱ्यांमध्ये प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. योगेश शर्मा, कार्याध्यक्ष अमोलप्पा स्वामी, अध्यक्ष ॲड. अजित चिखलीकर, प्रा. अनिता चिखलीकर, उमेशप्पा ब्याकोडे, अर्चना ब्याकोडे यांचा समावेश आहे.

वसुंधरा प्रतिष्ठानने आतापर्यंत ६७ हजार वृक्ष लावले असून त्यातील ७५ टक्के झाडांचे संवर्धन झाले आहे. झाडांचा वाढदिवस, रोपवाटिका, एक विद्यार्थी एक झाड, प्रसाद म्हणून कापडी पिशवी आणि त्यासोबत फळाचे झाड, दरवर्षी पर्यावरण परिषद, ७६ गणेश मंडळांना सोबत घेऊन एक गणेश २१ वृक्ष लावण्याचा उपक्रम, खिळेमुक्त झाड अभियान, सेल्फी विथ ट्री, माणुसकीची दिवाळी आदी उपक्रम राबवून वृक्ष लागवड आणि संवर्धनाचा जागर निरंतर सुरू आहे. आता देहदानाचा वेगळा आदर्श प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. योगेश शर्मा करत आहेत.

झाड लावून संवर्धन केल्याशिवाय विद्यापीठाची पदवी नाही...
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात अंतर्गत असलेल्या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी किमान दोन झाडे लावून त्याचे संवर्धन करावे, असा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. तरच विद्यार्थ्यांना पदवी दिली जाणार आहे. वसुंधरा प्रतिष्ठानच्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय विद्यापीठाला घ्यावा लागला आहे. प्रतिष्ठानचा उल्लेख करून विद्यापीठाने जीआरही काढला आहे. विशेष म्हणजे वसुंधरा प्रतिष्ठानच्या या कार्याचे कौतुक राज्यपालांनी पत्र पाठवून केले आहे.

वृक्षरूपी गणरायाचा गणेशोत्सव...
वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सव काळामध्ये दरवर्षी औसा रोड परिसरात वृक्षरूपी गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. दहा दिवसांच्या या कालावधीमध्ये रक्तदान शिबिरासह विविध उपक्रम राबविले जातात. गणेशोत्सव काळात पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी जनजागृती केली जाते. वृक्षरूपी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भक्त हजेरी लावतात. यंदाही दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.

Web Title: Admirable! Six members of Vasundhara Foundation will do posthumous body donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.