लातुरात तपास पथकांच्या हाती बिहारच्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे!
By राजकुमार जोंधळे | Published: June 28, 2024 08:03 AM2024-06-28T08:03:09+5:302024-06-28T08:04:19+5:30
नीट परीक्षेसाठी महाराष्ट्रातील विद्यार्थी गुजरात, बिहारला का?
राजकुमार जाेंधळे
लोकमत न्यूज नेटवर्क, लातूर : नीट गुणवाढसंदर्भात लातुरातील आराेपींनी व्हाॅटसॲपवर मागवून घेतलेल्या प्रवेशपत्रांची यादी सध्याला २२ वर पाेहोचली आहे. यातील १४ जणांची ओळख पटली असून, त्यांची चाैकशीही करण्यात आली. काही प्रवेशपत्रे बिहार राज्यातील विद्यार्थ्यांची असल्याची माहिती चाैकशीतून समाेर येत आहे. या विद्यार्थ्यांचे आणि महाराष्ट्रातील आराेपी मुख्याध्यापक पठाण, शिक्षक संजय जाधव यांच्याशी काय ‘कनेक्शन’ आहे. याचीही कसून चाैकशी केली जात आहे.
लातूर, हैदराबाद मार्गाने नीटचे कनेक्शन दिल्लीतील गंगाधरपर्यंत धडकल्याची तपासयंत्रणांना खात्री पटली. महाराष्ट्रातील आराेपींचे दिल्ली, बिहार, उत्तराखंड राज्यातील एजंटांशी काही धाेगेदाेरे लागतात का? याचाही माग पथकांकडून काढला जात आहे. लातुरातील १४ प्रवेशपत्रांपैकी काही प्रवेशपत्रे बिहार राज्यातील विद्यार्थ्यांची आढळल्याचे समाेर आले असून, यातून महाराष्ट्र व बिहारचे नीट कनेक्शन असावे, असा संशय आता बळावत चालला आहे.
नीटमध्ये परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा विद्यार्थ्यांना असली तरी काहींनी महाराष्ट्राबाहेर गुजरात, बिहार आणि कर्नाटकातील केंद्र का निवडले, हा प्रश्न निर्माण होतो. या संदर्भात राजर्षी शाहू महाविद्यालयाचे नीट सेलचे प्रमुख प्रा. दिलीप देशमुख म्हणाले, परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा नसावी, शिवाय परराज्यात विद्यार्थी का जातात याबाबतचे पत्र एनटीएला एप्रिलमध्ये पाठविले होते.
गृह खात्याने मागवला अहवाल
‘नीट’ प्रकरणात लातुरात जि. प. शाळेचा मुख्याध्यापक जलीलखाँ पठाण आणि साेलापूरचा जि. प. शिक्षक असलेला संजय जाधव यांना अटक करण्यात आली असून, त्यांची सध्या पाेलिस काेठडीत कसून चाैकशी सुरू आहे. हे प्रकरण गृहमंत्रालयाने गांभीर्याने घेतले असून, चाैकशी अहवाल मागविल्याची माहिती आहे. या अहवालावर वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांची नजर आहे
इरण्णाच्या घरास टाळे
लातुरातील एका उच्चभ्रू साेसायटीत राहणाऱ्या इरण्णा काेनगलवार (वय ४०, रा. लातूर) याच्या घराला सध्या टाळे आहे. लातुरातून उमरगा येथे ये-जा करणाऱ्या इरण्णाने या साेसायटीत काही वर्षांपूर्वीच घर घेतले असल्याची माहिती मिळाली. लातूर पाेलिसांच्या तावडीतून इरण्णा निसटला असून, त्याच्या मागावर तपास यंत्रणांची विविध पथके आहेत.